Saturday, July 5, 2014

जंजिऱ्याचे सिद्दी

जंजिऱ्याचे सिद्दी
- सु. र. देशपांडे

रायगड जिल्ह्यातील जंजिरा या भूतपूर्व संस्थानचे राज्यकर्ते-नबाब. पश्चिम किनाऱ्यावरील राजपुरी (दंडा-राजपुरी) खाडीच्या मुखाच्या पश्चिमेस सु. ०·५ किमी.वर एका अवघड गोलाकार खडकाळ बेटावर जंजिरा किल्ला चौल (उत्तर) व दाभोळ (दक्षिण) या प्राचीन बंदरांच्या मधोमध वसला आहे. त्याला मुरुड-जंजिरा असेही म्हणतात. जझीरा (बेट) या अरबी शब्दावरुन जंजिरा हे नाव रुढ झाले आहे. परकीय प्रवाशांच्या वृत्तांतांत त्याचा सिगेरस किंवा झिगेरस बंदर असाही उल्लेख आढळतो. मराठाकालीन कागदपत्रांत क्वचित हबसाण असाही याचा उल्लेख येतो. ते ॲबिसियन किंवा अबिशियन शब्दाचे अपभ्रंश रुप असावे. या किल्ल्याच्या तटबंदीची उंची १३ ते १५ मी. असून महादरवाजा हुलमुखनामक दोन बुरुजांमध्ये आहे. त्याच्या कमानीवर अरबीत कालोल्लेखाचा कोरीव लेख आहे. कोटाच्या तटाला दोन किंवा तीन मजली २७ मीटरच्या अंतराने बांधलेले २२ बुरुज आहेत. त्यांतून माऱ्याची जागा तसेच आतील बाजूस विश्रांतीची जागा आहे. त्यात दारुगोळा ठेवण्याची सोय होती. तटभिंतींच्या आतील बाजूस चहूबाजूंनी खंदक होता. बालेकिल्ल्यात शियापंथीय पीराचे पंचायतन स्मारक असून कार्तिक पौर्णिमेला जत्रा भरते. मुळात हे कोळ्यांचे जुने श्रद्घास्थान असून त्यास रामपंचायतन म्हणतात. जवळच सिद्दी घराण्यातील पुरुषांच्या-सरदारांच्या कबरी आहेत. कोटात चार मशिदी, तलाव, मोहल्ले, वाडे वगैरेंचे अवशेष आढळतात. याशिवाय तेथील तीन देशी व सहा विदेशी तोफा हे पर्यटकांचे आकर्षण होय. विदेशी तोफांत तीन स्वीडनच्या आणि स्पेन, नेदर्लंड्स (हॉलंड) व फ्रान्स यांची प्रत्येकी एक तोफ आहे. किल्ल्यात अनेक फार्सी शिलालेख असून १५७६-७७ च्या शिलालेखात निजामशहाच्या आज्ञेने फाहिमखानाची जंजिऱ्याचा मुख्याधिकारी म्हणून नेमणूक झाली आणि त्याने हा अभेद्य किल्ला व तटबंदी बांधली, असा उल्लेख आहे. अरबी समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील हा सुप्रसिद्घ किल्ला मराठे, डच, इंग्रज आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्या सैन्यांनी अनेकदा हल्ले करुनही अजिंक्य राहिलेला आहे. पंधराव्या शतकाच्या मध्यास ॲबिसिनिया व पूर्व आफ्रिकेतून पश्चिम भारतात लोक येऊ लागले. अरब-अल्-हबीश (हबश) येथून येणारे हे लोक हबशी म्हणून ओळखले जात. त्यांना सौदी असेही म्हणत. सय्यद वा सय्यदी (हजरत महंमदांचा वंशज) या नावाचा अपभ्रंश होऊन सिद्दी हा शब्द रुढ झाला असावा. हबशांना मुख्यतः गुलाम म्हणून पोर्तुगीजांनी हिंदुस्थानात आणले; तरी त्यांची निष्ठा, धैर्य व कार्यक्षमता यांमुळे बहमनी दरबारात त्यांना दर्जा लाभला. अल्पावधीत हबशी लोक हे पश्चिम भारतातील कुशल व धाडसी दर्यावर्दी आणि सैनिक म्हणून प्रसिद्घ झाले. ‘सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी’ हैदराबाद (दक्षिण) या संस्थेने सिद्दी जमातीचा सर्वंकष अभ्यास व संशोधन करुन ऐतिहासिक पुराव्यांशी सुसंगत काही निष्कर्ष काढले आहेत (२०११).

जंजिरा निजामशाहीच्या अखत्यारीत येण्यापूर्वीचा सुसंगत इतिहास उपलब्ध नाही. येथे पूर्वी कोळ्यांची वस्ती होती. दर्यावर्दी चाचे व लुटारुंपासून संरक्षण व्हावे, म्हणून त्यांनी या सुरक्षित बेटावर लाकडी मेढेकोट बांधला होता. बहमनी सुलतानांच्या कारकीर्दीत जुन्नरचा सुभेदार मलिक अहमद याने १४८२-८३ दरम्यान किल्ल्याला वेढा दिला; पण यश मिळाले नाही. बहमनी सत्तेच्या विभाजनानंतर मलिक अहमद या निजामशाहीच्या पहिल्या सुलतानाने १४९० मध्ये जंजिरा जिंकून कोळ्यांना ठार केले. किल्ल्याची डागडुजी करुन याकूतखान या हबशी आरमार प्रमुखाच्या तो ताब्यात दिला. दुसऱ्या एका प्रवासवर्णनातील वृत्तांतानुसार (क्लूनची इटिनेररी) पेरिमखान नावाच्या सिद्दीने कोळ्यांना फसवून जंजीरा हस्तगत केला, असा उल्लेख मिळतो. पेरिमखान बारा वर्षे जंजिऱ्यावर होता आणि १५३८ मध्ये मरण पावला. लारकोमच्या माहितीनुसार अहमदनगरच्या बुऱ्हान निजामशहाने (१५०९— ५३) जंजिरा व दंडा-राजपुरीचा सुभा त्याचा इराणी शिया मंत्री शाह ताहिर याच्याकडे सोपविला; तथापि पेरिमखानानंतर आलेल्या बुऱ्हान या आरमार प्रमुखाने १५६७— ७१ दरम्यान हा बुलंद किल्ला बांधला असा उल्लेख मिळतो. त्याने त्यास ‘मेहरुब’ (चंद्रकोर) हे नाव दिले; मात्र तेथील उपलब्ध फार्सी शिलालेखात फाहिमखान याने १५७६-७७ दरम्यान किल्ला बांधल्याची नोंद आहे. पुढे १६०० मध्ये अकबराने अहमदनगर जिंकले, तरी लवकरच मलिक अंबरने (१५४९— १६२६) निजामशाहीचा बराच प्रदेश परत मिळविला. १६१८ मध्ये जंजिऱ्याचा सिद्दी सिरुर (सुरुल) हा निजामशहाकडून जहागीरदार म्हणून सनद घेऊन आला व त्याने स्वतःस जंजिरा संस्थानचा पहिला नबाब म्हणून जाहीर केले. त्यावेळी दंडा-राजपुरी हे मुख्यालय असून जंजिऱ्याच्या नबाबाच्या आधिपत्याखाली सावित्री नदीपासून नागोठाण्यापर्यंतचा मुलूख होता. त्याच्या जागी १६२० मध्ये सिद्दी याकुतखान आला. त्यानंतर १६२१ मध्ये सिद्दी अंबर नबाब झाला. मोगलांनी निजामशाही नष्ट करेपर्यंत (१६३६) दंडा-राजपुरीसह कुलाबा अहमदनगरच्या सुलतानांकडेच होता. मोगलांनी जंजिऱ्यासकट कोकणचा प्रदेश विजापूरच्या आदिलशाहीकडे सुपूर्त केला. त्याबरोबर सिद्दी अंबर विजापूरचा ताबेदार झाला. यावेळी जंजिरा संस्थानच्या सीमा वाढल्या होत्या. पूर्वेस रोहा-माणगाव तालुके, दक्षिणेस बाणकोटची खाडी, पश्चिमेस अरबी समुद्र व उत्तरेस रोह्याच्या खाडीपर्यंत ते विस्तारले होते. त्याचा उपयोग विजापूरचा सागरी व्यापार व मक्केसाठी जाणाऱ्या यात्रेकरुंना होऊ लागला. जंजिऱ्याच्या सिद्दी प्रमुखास आदिलशहाने वझीर किताब दिला. वझीर सिद्दी अंबर १६४६ मध्ये मरण पावला. त्याच्या जागी सिद्दी युसुफ नबाब झाला. त्याच्या मृत्यूनंतर (१६५५) फतेहखान वझीर झाला. यापूर्वी शिवाजी महाराजांनी जंजिरा घेण्याचे प्रयत्न केले होते. पण यश आले नाही. म्हणून १६७० मध्ये महाराजांनी जंजिऱ्यास खुष्कीच्या मार्गाने तसेच समुद्रमार्गे वेढा घातला. पोर्तुगीजांनी सिद्दीस गुप्तपणे दारुगोळा पुरविला; तरी महाराजांचे सैन्यबळ पाहून सिद्दी जंजिरा त्यांच्या स्वाधीन करण्यास राजी झाला. तेव्हा सिद्दी फतेहखानाच्या हाताखालील सरदार संबळ, कासिम व खैरियत सिद्दी यांनी विरोध करुन फतेहखानास कैद केले व लढा चालू ठेवला. त्यांनी मोगलांचे मांडलिकत्व स्वीकारुन मदत मागितली. सुरतच्या मोगल अधिकाऱ्याने ती दिली. औरंगजेबाने सिद्दी संबळ यास याकुतखाँ हा किताब दिला व त्यास सुरतच्या महालातून तीन लाखांची जहागीर दिली. त्यामुळे सिद्दी संबळ मोगल आरमाराचा प्रमुख झाला आणि सिद्दीचे वर्चस्व सुरतपर्यंत प्रस्थापित झाले. सिद्दी कासिम व सिद्दी खैरियत यांना अनुक्रमे मे जंजिरा आणि किनाऱ्यावरील दंडा-राजपुरी व अन्य प्रदेश देण्यात आले, त्यामुळे यावेळीही महाराजांना यश लाभले नाही. त्यानंतरही शिवाजी महाराजांनी १६७१, १६७३ व १६७६ मध्ये इंग्रज, पोर्तुगीज यांच्याबरोबर तह करुन जंजिरा घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १६७६ मध्ये संबळ व कासिम यांत वैर निर्माण झाले. तेव्हा कासिमने नौदलप्रमुख पद मिळविले. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर (१६८०) छत्रपती संभाजींनी जंजिरा घेण्याचा निकराचा प्रयत्न केला (१६८२); पण त्यांनाही ते जमले नाही. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर (१६८९) रायगडसह अनेक किल्ले मोगलांच्या हाती आले. कान्होजी आंग्रे हा मराठ्यांच्या आरमारातील अत्यंत पराक्रमी व धैर्यवान नेता होता. १६९४ ते ९८ पर्यंत कोकणपट्टीतले मोगलांनी व इतरांनी काबीज केलेले मराठ्यांचे त्याने सर्व किल्ले परत घेतले गेले. कान्होजीच्या मोहिमेचे मुख्य ध्येय संभाजींच्या हत्येनंतरच्या संघर्षात सिद्दीने बळकावलेला मराठा प्रदेश पुन्हा मिळविणे हे होते. सिद्दी आणि पोर्तुगीजांनी आंग्रेच्या विरोधात मुघलांशी सलोखा केला; परंतु कान्होजीने या त्रयींचा पराभव केला. औरंगजेबाने सिद्दीने केलेल्या मदतीपोटी त्याला मराठ्यांची कोकणातील सर्व ठाणी दिली. मराठ्यांचे रायगड, सुवर्णदुर्ग, पद्मदुर्गासह अनेक किल्ले त्याच्या ताब्यात आले होते. सिद्दी घराण्यातील सिद्दी सात हा गोवलकोट व अंजनवेल किल्ल्यांवर मुख्य प्रशासक होता. महाराणी ताराबाईंच्या कारकिर्दीत रामचंद्रपंतांनी सिद्दीवर हल्ला केला (१७०१); परंतु यश आले नाही.

सिद्दी कासिम मरण पावल्यावर (१७०७) पद्मदुर्गाचा किल्लेदार सिरुरखान त्याच्या जागी आला. त्याच्या मृत्यूनंतर (१७३४) सिद्दी रेहमान जंजिऱ्याचा नबाब झाला. १७३९ मध्ये हुसेनने त्यास पदच्युत करुन नबाबी मिळविली. तत्पूर्वी सिद्दी सात या शूर, मर्द व राजकारणी सेनापतीचा चिमाजी आप्पांनी पराभव करुन त्यास रेवासजवळ चरईच्या लढाईत ठार केले. त्याच्या सोबतच्या या लढाईत (१७३६) देवकोंड नाईक, सुभानजी घाटगा, फाईम, बाळाजी शेणवी वगैरे जंजिऱ्याचे मातब्बर सरदारही मारले गेले. हुसेन सिद्दीनंतर (१७४५) सय्यद अल्लाना गादीवर आला; पण त्यास सिद्दी इब्राहिमने पदच्युत करुन (१७४६) गादी बळकाविली.

मिया आचन सिद्दी १७४८ मध्ये जंजिऱ्याचा प्रशासक बनला. पुढे १७५१ मध्ये सिद्दी मसूदने त्यास घालविले. मसूद वारल्यानंतर (१७५६) बरेच सिद्दी बदलले. मराठ्यांविरुद्घ इंग्रज सतत सिद्दीस मदत करीत, तसेच गोव्याचे पोर्तुगीजही, त्यांना दारुगोळा व शस्त्रसामग्री पुरवीत असत. तथापि या दोन्ही परकीय सत्तांना जंजिऱ्यावर वर्चस्व मिळविता आले नाही. सिद्दी घराण्यात गादीवरुन अंतःकलह चालू झाले. त्याचा फायदा नाना फडणीसांनी १७९१ मध्ये घेऊन सिद्दी गादीचा एक हक्कदार बालूमिया याला सुरतेजवळची सचिनची जहागीर देवविली व जंजिऱ्याचा करार केला; पण पेशवे प्रत्यक्ष जंजिऱ्याचा ताबा मिळवू शकले नाहीत. त्या वेळचा जंजिऱ्याचा नबाब सिद्दी जोहर इंग्रजांना शरण गेला. पेशवाईच्या अस्तानंतर (१८१८) इंग्रजांनी जंजिऱ्यावर वर्चस्व प्रस्थापित करुन १८३४ मध्ये त्यास मांडलिक केले. तेथील टांकसाळ बंद केली. सिद्दी मुहम्मद याने १८४८ मध्ये राज्यत्याग करुन सिद्दी इब्राहिम या मुलास गादीवर बसविले. १८६७ मध्ये जंजिऱ्याचा नबाब व तेथील सरदार यांत तीव्र मतभेद निर्माण झाले. इंग्रजांनी तेथील नबाबाला पदच्युत करुन (१८६९) तिथे इंग्रज रेसिडेंट नेला. पुढे नबाबाने इंग्रजांशी करारनामा केला. तेव्हा त्याचे पद चालू ठेवले, पण अधिकार कमी केले. सिद्दी इब्राहिम खान १८७९ मध्ये मरण पावला. त्याच्या तीन मुलांपैकी (पहिले दोन अनौरस व धाकटा औरस) धाकट्या अल्पवयीन सिद्दी अहमद खान या मुलास इंग्रजांनी गादीवर बसविले. त्याने राजकोट-पुण्याला शिक्षण घेऊन सज्ञान झाल्यावर त्याच्याकडे इंग्रजांनी राज्यकारभार दिला. त्याने संस्थानात शाळा काढली. मुरुडचे जंगल तोडून रस्ते केले. १८९२ मध्ये पिण्याच्या पाण्यासाठी व्हिक्टोरिया ज्युबिली वॉटर वर्क्स ही योजना राबविली. शिवाय नगरपालिका आणि लोकल बोर्डाची स्थापना करुन पायाभूत सुविधा निर्माण केल्या. या त्याच्या कार्याविषयी ब्रिटिशांनी त्यास के. सी. आय्. ई. हे बिरुद बहाल केले. त्यास ७०० लोकांचे संरक्षक दल ठेवण्याची मुभा होती. भारतीय स्वातंत्र्यानंतर (१९४७) जंजिरा संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले (१९४८) व ते मुंबई राज्यात समाविष्ट करण्यात आले.

सिद्दी लोक पराक्रमी, लढवय्ये होते, त्याचबरोबर उत्तम खलाशी होते. मलिक अंबर, मलिक काफूर, मलिक याकुब, फतेहखान, सिद्दी संबळ, याकुबखान, सिद्दी कासीम, सिद्दी मसूद, सिद्दी सात, सिद्दी खान, सिद्दी सुभान इ. अनेक सरदार हुशार, बुद्घिमान आणि लढवय्ये म्हणून विख्यात होते. अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात चाचेगिरी करण्याचा त्यांचा उद्योग होता.

पहा : जंजिरा संस्थान.

संदर्भ :
१. केळकर, य. न. इतिहासातील सहली, पुणे, १९५१.
२. देवळे, श. रा. महाराष्ट्रातील किल्ले, पुणे, १९८१.
३. पुरोहित, श्री. रा. किल्ले जंजिरा, भारतीय इतिहास आणि संस्कृती, त्रैमासिक, १ एप्रिल १९६९, मुंबई.
४. बेंद्रे, वा. सी. जंजिरेकर सिदी; शिवाजी निबंधावली, भाग २, पुणे, १९३४.
५. भोसले, बा. के. जंजिरा संस्थानचा इतिहास, बडोदे, १८९८.
६. सरदेसाई, गो. स. मराठी रियासत (सुधारित आवृत्ती), खंड १ ते ३, मुंबई, १९८८ व १९८९.

http://marathivishwakosh.in/khandas/khand19/index.php?option=com_content&view=article&id=10404

No comments:

Post a Comment

Hi, feel free to tell me anything you want related to maratha navy;
if u think i made a mistake somewhere, or i forgot something to add, or if you simply liked anything i wrote, please do tell me, it will help me improve.
thanks.

Ps:- if i may be wrong on a certain topic, please tell me the correct version or at least quote the source of correct version. thanks again.