दापोली मोठा सुंदर गाव आहे. तेथील हवा फार आरोग्यदायक आहे. तेथून समुद्र चार कोस दूर आहे. दापोलीस खूप मोठमोठी मैदाने आहेत. एका काळी येथे इंग्रजाची पलटण होती; म्हणून दापोलीस कँप दापोली असेही म्हणतात. या कँमनंतर ‘काप’ असा अपभ्रंश झाला व हल्ली कापदापोली असे म्हणतात. तसे पाहिले, तर माझा तालुका इंग्रजांच्या ताब्यात इतर महाराष्ट्रात आधी गेला. नानासाहेब पेशव्यांनी आंग्रे यांचे आरमार इंग्रजाच्या मदतीने बुडविले. फारच मोठी चूक होती ती. आंग्रयांच्या आरमारचा इंग्राजांना पायबंद होता. इंग्रजांच्या व इतरांच्या आरमाराचा आंग्रयांनी अनेकदा अरबी समुद्रात पराभव केला होता. शिवाजीमहाराजांनी मोठ्या प्रयत्नाने आरमार उभारले होते. पूर्वी मराठ्यांचे एक होडकूही अरबी समुद्रात फ़िरकत नव्हते; परंतु या महापुरुषाने आरमारचे महत्त्व ओळखले होते. ज्याचा दर्या त्याचे वैभव. हे सूत्र त्यांच्या राजनीतीत सांगितलेले आहे. परंतु नानासाहेबाने इंग्रजांच्या मार्गातील ही अडचणी आपणहून दूर केली. इंग्रजांनी आंग्रयांचे आरमार नाहीसे करण्यात जी मदत केली, त्याचा मोबदला म्हणून जो मुलूख मिळाला, त्यात बाणकोट वगैरे दापोली तालुक्यातील बंदरकाठी गावे होती.
- साने गुरूजी, श्यामची आई.
No comments:
Post a Comment