Saturday, July 25, 2015

जंजिरे सुवर्णदुर्ग आणि कान्होजी आंग्रे

जंजिरे सुवर्णदुर्ग.
साभार: विकिमिडिया कॉमन्स

मराठा आरमाराच्या इतिहासात सुवर्णदुर्गाचे अनन्यसाधारण महत्व आहे.
कान्होजी आंग्रेंचे वडील, तुकोजी आंग्रे, यांची नेमणूक इथेच होती. जवळच हरणई बंदरात कान्होजी आंग्रेंचा जन्म झाला होता.

कान्होजी आंग्रेंची पहिली नेमणूक सुद्धा याच किल्ल्यावर होती. इथेच ते आपल्या स्वकर्तुत्वाने किल्ल्याचे सरनोबत, म्हणजेच दुय्यम किल्लेदार, झाले.

पुढे संभाजी महाराजांच्या काळात सिद्दीच्या वेढ्याला तोंड देत कान्होजींनी किल्ला लढवला. फितूर होऊ पाहणाऱ्या किल्लेदारास कैद करून त्यांनी सिद्दीच्या फौजेवर धाड टाकण्यास सुरुवात केली.

अशाच एका धाडीत ते सिद्दींच्या तावडीत सापडले. पण पाहरेकऱ्यांच्या बेसावधपणाचा फायदा उचलून एका रात्री त्यांच्या कैदेतून फरार झाले, ते थेट सुवर्णदुर्गला पोहोचले.

त्यांच्या शौर्य आणि चिकाटीची कदर करून त्यांना सुवर्णदुर्गाची किल्लेदारी बहाल केली गेली.

सरखेल कान्होजी आंग्रे.
तैलचित्र, पुणे बोट क्लब.
पुढे कान्होजींची प्रतिभा, चिकाटी आणि कार्यक्षमता पाहून त्यांची बदली जंजिरे कुलाबा, म्हणजेच मराठा आरमाराच्या मुख्यालयात झाली. इथे ते सर-सुभेदार सिधोजी गुजर यांच्या हाताखाली काम करू लागले.

अशा प्रकारे या जंजिरे सुवर्णदुर्गाने कान्होजींच्या वाढत्या वर्चस्वाचा आणि त्यांच्या तरुण नेतृत्वाचा इतिहास आपल्यात दडवून ठेवला आहे.