
ह्या घराण्याचा यापुढील पाऊणशें वर्षांचा इतिहास उपलब्ध नाहीं. इ. स. १७५६ मध्यें तुळाजी आंग्रे यास कैद केल्यानंतर पेशव्यांनीं विजयदुर्ग येथें आपल्या प्रत्यक्ष अधिकाराखालीं आरमाराचें मुख्य ठिकाण करून त्यास सुभा आरमार अशी संज्ञा दिली. या आरमारावर मुख्य अधिकारी एक असून त्यास सुभेदार निसबत सुभा आरमार असें म्हणत. इ. स. १७६४ मध्यें हणमंतराव मोरे यांचे वंशज आनंदराव धुळप या दर्यायुद्धांत नाणवलेल्या गृहस्थाकडे मराठ्यांच्या आरमाराचें आधिपत्य आलें. इ. स. १७९४ पर्यंत म्हणजे जवळ जवळ ३० वर्षे आनंदराव हाच सुभ्याचा प्रामुख्येंकरून कारभार आटपीत असे (आनंदरावाची हकीकत ज्ञानकोश विभाग ७ यांत त्याच्या नांवाखालीं पृ. १५३ वर पहा.). आनंदरावाप्रमाणेंच हरबाजीराव, जानोजीराव इत्यादि धुळप मंडळींनीं आरमाराची उत्कृष्ट कामगीरी करून पेशव्यांकडून वेळोवेळीं बक्षिसेंहि मिळविली. इ. स. १८१८ मध्यें पेशवाई नष्ट झाल्यानंतर त्याच्या वंशजांस इंग्रजांनीं `पोलिटिकल पेन्शन’ करून दिलें. श्री. कृष्णराव रघुनाथराव ऊर्फ बाबासाहेब या घराण्याचे विद्यामान वंशज हल्लीं विजयदुर्ग येथें राहतात.विजयदुर्ग येथील किल्ला, गोदी, वगैरे स्थलें प्रेक्षणीय आहेत. थोरले माधवराव पेशवे यांनीं स. १७७४ त जानोजी धुळप यास दक्षिणेंत स्वारीस पाठविलें होतें. इ. स. १७७५ मध्यें महीच्या पैलतीरी हरिपंत फडके व दादासाहेब यांचें युद्ध झाल्यावर पेशव्यानें जानराव धुळप यांस सांगितलें कीं दादासाहेब मुरतेकडून जाहाजांतून जलमार्गे एखादेंकडे जातील, याची बातमी व बंदोबस्त ठेवून, प्रसंगीं त्यांशीं गांठ घालून हस्तगत करून घेणें. ले. प्रूएन वगैरे इंग्रजांशीं झालेल्या दर्यायुद्धांत (१७८३ एप्रिल) धुळपांनीं फार पराक्रम केला. त्याबद्दल पेशव्यांनीं त्यांस बक्षीसें दिलीं. [भा.इ.मं. अहवा. १८३३; लो.- हिस्टरी ऑफ धि नेव्ही; स्टेट पेपर्स बाँबे.]
साभार : केतकर ज्ञानकोश.
टीप : वरील माहिती हि दुसऱ्या महायुद्धा आधी लिहिलेली आहे. त्यामुळे यात नवीन माहिती नाही आहेत.