Showing posts with label Maratha Naval Officers. Show all posts
Showing posts with label Maratha Naval Officers. Show all posts

Thursday, May 15, 2014

Kanhoji Angre - Manohar Malgaonkar | कान्होजी आंग्रे - मनोहर मळगावकर

१८व्या शतकाच्या सुरुवातीला जमिनीवर कोणाचीही सत्ता असो. खंदक आणि भिंतीच्या बंदोबस्ताआड असणाऱ्या व्यापारी वसाहतीवर कोणाचीही मालकी असो. पण कोंकणच्या पाण्यावर सत्ता कोणाची होती यात दुमत नव्हतं.
सत्ता होती ती फक्त "कान्होजी आंग्रे" यांचीच.....

कान्होजी आंग्रे- मनोहर मळगावकर
, अनुवाद - पु.ल. देशपांडे



Tuesday, May 13, 2014

आरमाराचे सुभेदार धुळप यांच्या घराण्याची त्रोटक माहिती

आरमाराचे सुभेदार धुळप यांच्या घराण्याची त्रोटक माहिती.

धुळप यांचें मूळचें उपनांव मोरे, हे मूळ उत्तर हिंदुस्थानांतील रहिवासी. ह्या घराण्यांतील परसोजी बाजी व जयाजी बाजी या उभयतां बंधूंनीं सह्याद्रीच्या पूर्वेस कृष्णा व वारणा या दोन नद्यांच्या मध्यें जावळीं व त्याच्या सभोंवतालचा मुलूख काबीज करून, जावळी हें आपल्या राहण्याचें ठिकाण केलें. परसोजीस पांच पुत्र झाले. (१) हणमंतराव, (२) बागराव, (३) कमलराव, (४)सुर्याजीराव व (५) चंद्रराव. जयाजी हा निपुत्रिक होता. शिवाजीच्या कारकीर्दीत चंद्रराव, सूर्याजीराव व हणमंतराव ह्या त्रिवर्गांचा शेवट झाला, नंतर हणमंतराव याचे मुलगे खेमाजी व चायाजी; बागराव याचा प्रतापजी; सुर्याजीराव याचा दादाजी; व चंद्रराव याचा बाळाजी येणेप्रमाणें मोरे घराण्यांतील मंडळी स्वसंरक्षणार्थ विजापूरच्या बादशहाच्या आश्रयास जाऊन राहिली. वरील सहा जणांनीं विजापूरकरांच्या वतीनें समशेर गाजविल्यामुळें, बादशहानें खुष होऊन `धुळप’ असा बहुमानाचा किताब दिला, अशी माहिती मिळते. विजापूरकर व शिवाजी यांच्या झटापटींत या मोऱ्यांपैकीं-धुळपांपैकीं बरीच मंडळीं कामास येऊन, शेवटी छत्रपतींच्या धाकानें अवशिष्ट मंडळी वाट फुटेल तेथें जाऊन राहिली (हणमंतराव व चंद्रराव यांचे वंशज धवडे बंदरीं, बागराव यांचे दुदुशी दुदगांवीं, सूर्याजीराव यांचे वसईस व कमळराव यांचे बीरवाडीत गेले).

ह्या घराण्याचा यापुढील पाऊणशें वर्षांचा इतिहास उपलब्ध नाहीं. इ. स. १७५६ मध्यें तुळाजी आंग्रे यास कैद केल्यानंतर पेशव्यांनीं विजयदुर्ग येथें आपल्या प्रत्यक्ष अधिकाराखालीं आरमाराचें मुख्य ठिकाण करून त्यास सुभा आरमार अशी संज्ञा दिली. या आरमारावर मुख्य अधिकारी एक असून त्यास सुभेदार निसबत सुभा आरमार असें म्हणत. इ. स. १७६४ मध्यें हणमंतराव मोरे यांचे वंशज आनंदराव धुळप या दर्यायुद्धांत नाणवलेल्या गृहस्थाकडे मराठ्यांच्या आरमाराचें आधिपत्य आलें. इ. स. १७९४ पर्यंत म्हणजे जवळ जवळ ३० वर्षे आनंदराव हाच सुभ्याचा प्रामुख्येंकरून कारभार आटपीत असे (आनंदरावाची हकीकत ज्ञानकोश विभाग ७ यांत त्याच्या नांवाखालीं पृ. १५३ वर पहा.). आनंदरावाप्रमाणेंच हरबाजीराव, जानोजीराव इत्यादि धुळप मंडळींनीं आरमाराची उत्कृष्ट कामगीरी करून पेशव्यांकडून वेळोवेळीं बक्षिसेंहि मिळविली. इ. स. १८१८ मध्यें पेशवाई नष्ट झाल्यानंतर त्याच्या वंशजांस इंग्रजांनीं `पोलिटिकल पेन्शन’ करून दिलें. श्री. कृष्णराव रघुनाथराव ऊर्फ बाबासाहेब या घराण्याचे विद्यामान वंशज हल्लीं विजयदुर्ग येथें राहतात.विजयदुर्ग येथील किल्ला, गोदी, वगैरे स्थलें प्रेक्षणीय आहेत. थोरले माधवराव पेशवे यांनीं स. १७७४ त जानोजी धुळप यास दक्षिणेंत स्वारीस पाठविलें होतें. इ. स. १७७५ मध्यें महीच्या पैलतीरी हरिपंत फडके व दादासाहेब यांचें युद्ध झाल्यावर पेशव्यानें जानराव धुळप यांस सांगितलें कीं दादासाहेब मुरतेकडून जाहाजांतून जलमार्गे एखादेंकडे जातील, याची बातमी व बंदोबस्त ठेवून, प्रसंगीं त्यांशीं गांठ घालून हस्तगत करून घेणें. ले. प्रूएन वगैरे इंग्रजांशीं झालेल्या दर्यायुद्धांत (१७८३ एप्रिल) धुळपांनीं फार पराक्रम केला. त्याबद्दल पेशव्यांनीं त्यांस बक्षीसें दिलीं. [भा.इ.मं. अहवा. १८३३; लो.- हिस्टरी ऑफ धि नेव्ही; स्टेट पेपर्स बाँबे.]

साभार : केतकर ज्ञानकोश.

टीप : वरील माहिती हि दुसऱ्या महायुद्धा आधी लिहिलेली आहे. त्यामुळे यात नवीन माहिती नाही आहेत.

Tuesday, April 1, 2014

तीन आरमारी घराणी

मराठेशाहीत कितीतरी आरमारी घराणी होऊन गेली असतील. पण सध्या आरमारी घराणी, किंवा त्यांचे वंशज सहजासहजी सापडत नाही. यांत कोणी समुद्रावर कीर्ती प्राप्त केली असावी, तर कोणी जंजिरे, जहाजे बांधली असावी, तर कोणी दरबारी, दिवाणी कामं सांभाळली असावी. पण आज हे आहेत कुठे?

माझ्या माहितीतील सध्या विद्यमान असलेलली ३ घराणी...

शिवकालीन - भाटकर, भाट्ये गाव, रत्नागिरी.

आंग्रेकालीन - आंग्रे, अलिबाग
पेशवेकालीन - धुळप, विजयदुर्ग.

आरमाराच्या तीन कालखंडाच्या तीन घराणी फक्त !!!
बाकीचे कुठे आहेत? काय करत आहेत? काहीच पत्ता नाही

काही मोजकी आडनावे खाली देत आहे. पहा, कदाचित यांत आपलं आडनाव तर नाही ना?

कोळी-पाटील, सारंग, भंडारी, काटे, जाधव, खान, वाघमारे, खराटे, खराडे, पडवळ, सूर्यवंशी, मोहिते, गुजर, मीरा, बेळोसे, कुवेस्कर, जैतापुरकर, विचारे, कांबळी, तेंडूलकर, घाटे, फडके, गोळे, शिंदे, इतबार, हसन, याकुब, काळेगावकर, मिस्त्री/मेस्त्री, मानकर, महाडिक, शेलाटकर, पोटे, मयेकर, बापट, सिर्सेकर...

अजून कितीतरी नावं शोधायची बाकी आहेत. आणि अशी कितीतरी नावं आपल्याला कधीच कळणार नाही... 

पण शोधायचं काम मी थांबवणार नाही. 

छत्रपती स्वामींच्या पुण्यप्रतापे यश मिळवू.

टीप : वरील चित्राचे कलाकार कोण आहेत याची मला कल्पना नाही. म्हणून त्यांचे नाव इथे नमूद करू शकलेलो नाही. तरी, याचे हक्कदार मी शोधत आहे. जर आपण असाल तर कृपया pratish@marathanavy.in वर इमेल करावे. आपले नाव इथे नमूद करू.