मुंबई बेटावर वांद्रे, माहीम, वरळी, काळा किल्ला, रिवा, शीव, शिवडी, माझगाव, डोंगरी, सेंट जॉर्ज फोर्ट, बॉम्बे फोर्ट असे एकूण अकरा किल्ले बांधण्यात आले आहेत. पैकी बॉम्बे,फोर्ट, माझगाव आणि डोंगरी हे किल्ले आज अस्तित्वात नाहीत. मात्र, मुंबईच्या इतिहासाची साक्ष देणारे वरळी, सायन, धारावी, माहीम आणि वांद्र्याचा किल्ला आजही आपल्या अस्तित्वासाठी धडपडत आहेत. एकेकाळी मुंबईची राखण करणारा शिवडीचा किल्लाही त्याला अपवाद नाही.
हार्बर लाइनवरचे शिवडी स्थानक. पश्चिमेला उतरलात की, सुक्या मासळीचा वास नाकात भरतो. शिवडीच्या पश्चिमेलाच तशी माणसांची वस्ती. पूर्वेकडचा भाग तसा ओसाडच म्हणावा लागेल. कारण माणसांची अगदीच तुरळक वस्ती आणि बाकी सगळं घासलेट बंदर म्हणूनच परिचित. याच ठिकाणी जानेवारी ते एप्रिल महिन्यात फ्लेमिंगो बघायला गर्दी होते. एरव्ही या परिसरात फारसं कोणी फिरकतच नसावं. दिवसाढवळ्याही या ठिकाणी माणसं तशी फारच कमी दिसतात. सुरुवातीची एक-दोन टपरीवजा दुकानं सोडली तर बाकी सगळा परिसर ओसाडच म्हणावा लागेल. असं जरी असलं तरी हा परिसर दुतर्फा झाडांचा. या रस्त्याच्या टोकाशी आलं की, समोरच दग्र्याचं नाव लिहिलेली हिरवी पाटी दिसते. त्या कमानीपासून पुढे लांब लांब पाय-या दिसतात. या पाय-या किल्ल्याच्या आहेत याची पुसटशी कल्पनाही कोणाला येणार नाही. या पाय-या चढून वर गेलं की, प्रथम नजरेत भरतो तो पांढरा, हिरा आणि गुलाबी रंगातला सैयद जलाल शाह सैयद मुराद शाह यांचा दर्गा दिसतो. दर्ग्याच्या बाजूला शिवडीच्या खाडीचा नयनरम्य परिसर नजरेत भरतो. पायऱ्या चढून आल्याचा शीण कुठल्या कुठे निघून जातो. या खाडीचं आणखी एक वैशिटय़ म्हणजे या खाडीतून समोरच चेंबुरचे अणुशक्तीनगरही दिसतं. या निसर्गरम्य परिसराचा आस्वाद घेऊन जरासे वळलात की. बाजूलाच असलेली तटबंदी आपलं लक्ष वेधून घेते. हाच तो शिवडीचा किल्ला.
या किल्ल्याची तटबंदी आजही मजबूत आहे. मध्यंतरी किल्ल्याचं नूतनीकरण करण्यात आलं होतं. मुख्य रस्त्यापासून जरा लांब असल्याने गोंगाटाचा लवलेशही नाही. त्यात भक्कम तटबंदी त्यामुळे शिरकाव करताना मन जरा साशंक होतं. इतकंच काय इथे कोणाला काही झालं तरी कित्येक दिवस कोणाला कळणारच नाही. पण एकदा का किल्ल्यात शिरकाव केला की, आपण अवाक झाल्याशिवाय राहत नाही. मजबूत तटबंदीत असलेली मोकळी जागा, मध्येच असणा-या पाय-या यामुळे आसपासची मुलं येथे अभ्यास करायला येतात.
मुंबई बेटाच्या पूर्व किना-याचे रक्षण करण्यासाठी सेंट जॉर्ज, डोंगरी, माझगाव, शिवडी हे किल्ले बांधण्यात आले. बॉम्बे फोर्टवर होणारे थेट हल्ले या बालेकिल्ल्यांमुळे रोखता यावे, हा याचा मुख्य हेतू होता. शिवडीचा किल्ला बहादूरखानाच्या ताब्यात असताना किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पीराचा दर्गा बांधण्यात आला. १५३४ च्या तहात हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात आल्यावर या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली. १६७२ मध्ये जंजि-याच्या सिद्धीकडून मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर इंग्रजांनी अनेक नवीन किल्ले बांधले आणि जुने किल्ले मजबूत केले. परळ बेटाच्या पूर्व किना-यावरील टेकडीवर असलेल्या शिवडी किल्ल्याचे नूतनीकरण इंग्रजांनी १६८० मध्ये केले. १६८९ मध्ये जंजि-याच्या सिद्धी याकूत खानने मुंबईवर केलेल्या हल्ल्यात त्याने शिवडी, माहीम आणि माझगाव हे किल्ले जिंकले. त्यावेळी शिवडी किल्ल्यावर ५० शिपाई, एक सुभेदार आणि १० तोफा असल्याची नोंद ऐतिहासिक पुस्तकात सापडते. इंग्रजांनी देशांतर्गत शस्त्रूंचा बिमोड केल्यावर या किल्ल्याचा उपयोग तुरुंग म्हणून केला जात होता. त्यानंतरच्या काळात मुंबई पोर्ट ट्रस्टचे गोडाऊन म्हणून याचा उपयोग झाला. त्याआधी पनवेल, उरण, ठाणे घारापुरीचा डोंगर या परिसरात होणा-या व्यापारावर, जहाजांवर, लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे.
असा हा शिवडीचा किल्ला. इतर किल्ल्यांच्या तुलनेत या किल्ल्याची परिस्थिती तशी उत्तमच आहे, असं म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य नसलं तरी गर्दुल्ले, भिकारी यांचा विळखा पडला आहे. रात्रीच्या काळोखात या ठिकाणी गैरवर्तनही होत असल्याची माहिती किल्ल्याची देखभाल करणारे अब्दुल रहीम मुजावर यांनी दिली. गेली ४०० वर्षे मुजावर यांचं कुटुंब किल्ल्याच्या शेजारी असलेल्या दग्र्याची आणि किल्ल्याची देखभाल करत आहेत. ते म्हणतात, ‘आमच्या परीने जेवढं शक्य होतं तितकी देखभाल आम्ही करतो. पण प्रत्येकाला थोपवणं आम्हाला शक्य होत नाही.’
मुंबईच्या इतिहासात शिवडी किल्ल्याचे स्थान महत्त्वपूर्ण होते. सत्ता संपादनासाठी पूर्वी गडकिल्ल्यांचे महत्त्व होते. मात्र, आता सत्ता संपादनासाठी किल्ल्यांची गरज उरली नसल्यामुळे हा किल्लाही अडगळीत पडला आहे. मुंबईचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी या इतिहासाच्या साक्षीदाराचा उल्लेख करण्यावाचून गत्यंतर नसेल.