Thursday, June 26, 2014

Battle of Satavli - सातवलीची लढाई

१६७१ पासून सिद्दीने घेतलेला आक्रमक पवित्रा वाढतच चालला होता. दंडाराजपुरीच्या विजयानंतर खुद्द आलमगीर-औरंगजेबाने सिद्दीच्या डोक्यावर हात ठेवला होता. सिद्दी संबूल हा मुघलांचा आरमारी सुभेदार झाला. म्हणजेच अमीर अल बहऱ्र.

त्याने दाभोळ आणि नागोठणे सारखी संपन्न शहरे बेचिराख केली. तर केळशी येथील मराठ्यांच्या आरमाराची एक संपूर्ण तुकडीच जाळून राख केली.

आलमगीराचे द्रव्य आणि सिद्दींचा आरमारी हुन्नर, या संयुक्त बळापुढे नवख्या मऱ्हाटी आरमाराचे काय होणार हा प्रश्न सर्वांसमोर उभा होता.

आता सगळं काही एका निर्णायक लढाईच्या निकालावर अवलंबून होते.

त्यात सन १६७४ उजाडले. महाराजांनी रायगडावर राज्याभिषेक करून घेण्याचा निर्णय केला होता. पण जंजिरा हा रायगडापासून एका मजलीच्या अंतरावर होते. त्यामुळे सिद्दीचा धोका दूर करणे महत्वाचे होते.

महाराजांनी नेमके काय केले हे इतिहास सांगत नाही. पण मार्च १६७४ मध्ये इतिहासाची दिशा काही अशाप्रकारे बदलली.

मुचकुंदीच्या खाडीत (आजच्या पूर्णगड किल्ल्या समोर), आणि सातवली नावाच्या छोट्या कसब्याजवळ, सिद्दी संबूल आणि दौलतखान यांची दर्या गाजवणारी लढाई झाली.

दोन्ही बाजूंनी पराक्रमाची शर्थ झाली. सिद्दी संबूल आणि दौलतखान जातीने आपल्या आरमाराचे नेतृत्व करत होते. एकमेकांवर बाणांचा वर्षाव करून दोन्ही आरमार हातात तलवारी घेऊन भिडले.

मराठ्यांची ४४ माणसे कामी आली. तर खुद्द दौलतखानाच्या पायाला बाण लागून तो जखमी झाला.
पण सिद्दीचा दारूण पराभव झाला.
सिद्दी कडील १०० माणसे मेली, तर सिद्दी संबूलच्याच गलबताला आग लागली. यात त्याचे दोन्ही हात भाजले.

संबूलने इथून जो पळ काढला तो थेट हरीहरेश्वरला पोहोचल्यावरचं थांबला.

एकाप्रकारे दौलतखानाने महाराजांना राज्याभिषेकासाठी दिलेला नजराणाच हा.

या लढाईमुळे मराठ्यांना राजापूर ते बारदेश हा पूर्ण तळकोंकण प्रांत, सिद्दीची चिंता न करता, जिंकता आला.

राज्याभिषेकाला त्रास देणे सोडाच, उलट सिद्दीने परत आलमगीरकडे कुमक पाठवण्याची केविलवाणी विनंती सुरु केली. आणि चक्क सप्टेंबर १६७५ पर्यंत, म्हणजे दीड वर्ष, कोणत्याही प्रकारे मराठ्यांच्या नादी लागला नाही.

No comments: