Wednesday, October 10, 2018

Readers' questions: What are some good books to read about the Maratha Navy?

There aren’t many good books on Maratha Navy out there. Below I’m giving a list of few books, in English and Marathi, which are either available in market readily or available for free download.
English Books
A History of the Maratha Navy and Merchantships
- Dr. B. K. Apte

This 1973 book is still the best you can get today.
http://msblc.maharashtra.gov.in/pdf/newpdf/next20/A%20HISTORY%20OF%20THE%20MARATHA%20NAVY%20AND%20MERCHANTSHIPS.pdf
Early career of Kanhoji Angria and other papers.
- Sundranath Sen

This is a collection of 19 research essays by the author, 6 of which directly relate to Maratha Navy or Angre family.
Early Career Of Kanhoji Angria And Other Papers : Nath Sen Surendra : Free Download, Borrow, and Streaming : Internet Archive
Naval Resistance to Britain's Growing Power in India, 1660-1800: The Saffron Banner and the Tiger of Mysore.
- Philip MacDougall

Most of the western writing about Maratha Navy termed them as pirates, not this book. This book correctly identifies them as legitimate resistance to British dominance. It only partly explores Maratha Navy, but is an important read for those interested in the subject.
The book is too damn expensive...
Buy Naval Resistance to Britain`s Growing Power in I - The Saffron Banner and the Tiger of Mysore (Worlds of the East India Company) Book Online at Low Prices in India | Naval Resistance to Britain`s Growing Power in I - The Saffron Banner and the Tiger of Mysore (Worlds of the East India Company) Reviews & Ratings - Amazon.in
-------------
Marathi Books - मराठी पुस्तके
मराठा आरमार - एक अनोखे पर्व
- डॉ. सचिन पेंडसे.

२०१७ साली हे पुस्तक प्रकाशित झालेले असून, आता पर्यंतचे सर्वात सखोल अभ्यासात्मक पुस्तक आहे. पुस्तक खरेदीची लिंक खाली देत आहे.
Buy Maratha Armar- Ek Anokhe Parva (First Edtion, 2017) Book Online at Low Prices in India
Armar of Shivaji Maharaj, Kanhoji Angre, Tulaji Angre, Sekhoji Angre, Dhulap Armar, Armar of Peshwas, History of Indian Navy
शिवछत्रपतींचे आरमार
- गजानन भास्कर मेहेंदळे आणि संतोष शिंत्रे

फक्त छ. शिवाजी महाराजांच्या आरमारावर अभ्यास करून बनवलेले एकमात्र पुस्तक. संग्रही असावे असे. पुस्तक खरेदीची लिंक खाली.
Amazon.in: Buy Shivachatrapatinche Aramar Book Online at Low Prices in India
Shivchatrapatinche Armar, Gajanan Mehendale, Naval forces of Shivaji Maharaj, Ship building by Marathas, construction of sea forts
दर्याराज कान्होजी आंग्रे
-डॉ. सदाशिव शिवदे

कान्होजी आंग्रे यांच्यावरील आतापर्यंतचे सर्वात सखोल अभ्यासग्रंथ.
Daryaraj Kanhoji Angre, Angre family, Naval force of Shivaji, family history of Angre

NOTE: The answer was originally published on Quora.

Tuesday, January 16, 2018

मराठ्यांची आरमारे

मराठा गुराब इंग्रज जहाजावर चढाई करताना
मराठ्यांची आरमारे
- प्रतिश खेडेकर.
(साप्ताहिक जव्हार वैभव यांच्या सन २०१७च्या दिवाळी अंकात हा लेख प्रसिद्ध झाला होता.)
---

छ. शिवरायांनी समुद्राची बाजू सुरक्षित करण्याच्या हेतूने आरमाराची स्थापना केली होती. समुद्रावर बलशाली असलेल्या सिद्दी, पोर्तुगीज व इंग्रज यांच्या नाकावर टिच्चून एक स्वतंत्र राज्यांग निर्माण केले. पण, मराठ्यांच्या इतिहासात हे एकंच आरमार होते असे नाही. मराठ्यांच्या वेगवेगळ्या आरमारांचा घेतलेला हा धावता आढावा.

१. स्वराज्याचे आरमार:

१६५७ साली महाराजांनी आदिलशाही कडून चेउल ते माहुली पर्यंतचा मुलुख जिंकून घेतला. या प्रांतात पेन, पनवेल, कल्याण, व भिवंडी सारखी समृद्ध बंदरे होती. याच बंदरांमध्ये सर्वप्रथम आरमार बांधण्याची सुरुवात झाली. १६५९ च्या एका पोर्तुगीज पत्रात इथे २० गलबते बांधत असल्याचा उल्लेख मिळतो.

पुढे, १६६० च्या दशकात विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, हि नाविक तळे तयार झाली. १६७९ आणि ८० मध्ये क्रमाने जलदुर्ग खांदेरी आणि कुलाबा  बांधले गेले. विजयदुर्ग येथे ५७ नौका असल्याचे एका समकालीन प्रवाशीच्या वर्णनामध्ये उल्लेख आहे.

शिवाजी महाराजांच्याकाळी या संपूर्ण आरमाराची दोन सुभ्यात विभागणी केली गेलेली होती. प्रत्येक सुभ्यात २०० लहान मोठ्या नौका व त्यांच्यावर एक सुभेदार, म्हणजेच ऍडमिरल. महाराजांच्या काळातील दर्यासारंग, मायनाक भंडारी व दौलतखान हे सुभेदार आपल्याला ज्ञात आहेत.

संभाजी महाराजांनी आरमाराची पुनर्रचना केलेली दिसते. त्यांच्या काळात आरमारात पाच सुभे होते, व प्रत्येक सुभ्यात ५ मोठी गुराबे व १५ गलबते होती. तसेच, त्यांनी सरसुभेदार, ग्रँड ऍडमिरल, हे नवीन पद  निर्माण करून त्यांच्या हाताखाली पाचही सुभे दिले. गोविंदजी जाधव, सिदोजी गुजर, व कान्होजी आंग्रे हे क्रमाने छ. संभाजी, छ. राजाराम, व छ. महाराणी ताराबाई यांचे सरसुभेदार होते.

२. आंग्रेंचे आरमार

वर उल्लेख केल्याप्रमाणे कान्होजी आंग्रे हे ताराबाई यांच्या काळात आरमाराचे सरसुभेदार होते. त्यांनी अतुलनीय पराक्रम करून १७०० - १७०७ च्या काळात मोगलांपासून कोंकण किनारपट्टीचे रक्षण केले. १७०७ साली औरंगजेब वारला आणि त्याच्या मुलांमध्ये यादवी माजली. मराठ्यांचे युवराज शाहू हे पुन्हा महाराष्ट्रात आले आणि वारसा हक्काने छत्रपती पदावर अधिकार सांगू लागले. त्यावेळी यांना महाराणी ताराबाई यांनी विरोध केला होता. साहजिकच सरखेल कान्होजी आंग्रे हे ताराबाईंच्या पक्षात गेले. १७१४ साली कान्होजी यांना शाहूंचे पेशवे बालाजी विश्वनाथ भट यांनी शाहूंच्या बाजूने वाळवून घेतले. या मोबदल्यात आंग्रे यांना सरंजाम, व वंशपरंपरागत सरखेलपदवी मिळाली.

कान्होजी आंग्रे यांचे निधन १७२९ साली झाले. या २९ वर्षांच्या कारकिर्दीत इंग्रज, डच, पोर्तुगीज, यांचे एकूण पाच मोठे हल्ले त्यांनी परतवून लावले. आज आपण 'ऍडमिरल' या शब्दासाठी 'सरखेल' हा समानार्थी रूपाने वापरतो, याचे श्रेय फक्त आणि फक्त कान्होजी आंग्रेंना जाते. कान्होजींना ६ पुत्र होते. सेखोजी, संभाजी, मानाजी, येसाजी, धोंडजी व तुळाजी.

कान्होजींनंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र सेखोजी यांनी आरमाराचा कारभार सांभाळला. यांचा मृत्यू १७३३ साली झाला. पण आपल्या अल्प कारकिर्दीत त्यांनी सिद्दी कडून कोकणचा बराच भाग सोडवून घेतला होता.

सेखोजी नंतर त्यांचे धाकटे बंधू संभाजी सरखेल झाले. पण संभाजी आणि मानाजी मध्ये बेबनाव झाला. प्रकरण तलवारी उपसण्यापर्यंत गेले. अशावेळी, बाजीराव पेशव्यांनी मध्यस्थी करून आरमार आणि सरंजामचे दोन भाग केले. पहिला भाग संभाजीस देऊन त्यांना विजयदुर्ग येथे 'सरखेल'  पदवी सोबत स्थापित केले. व मानाजीस 'वजारत -म-आब' हि नवीन पदवी देऊन कुलाब्यास स्थापित केले. अशाप्रकारे आंग्र्यांच्या आरमाराची विभागणी झाली.

विजयदुर्ग, सन १८५५ - १८६२
अ) विजयदुर्गचे आरमार:

संभाजी आंग्रेंनी विजयदुर्गच्या आरमाराची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी इंग्रज, डच, पोर्तुगीज या त्रिकुटांना त्राही त्राही करून सोडले होते. १७३५ साली त्यांनी इंग्रजांचे 'डर्बी' हे जहाज समुद्रावर पकडले होते. या जहाजावरील संपत्ती इतकी होती ईस्ट इंडिया कंपनीला न भूतो न भविष्यती असा तोटा सहन करावा लागला होता. १७३८ साली डचांनी आजच्या जकार्ता येथून भले मोठे आरमार पाठवून विजयदुर्गवर हल्ला केला होता. पण या हल्ल्याला सुद्धा त्यांनी आपल्या वडिलांप्रमाणेचं परतवून लावले. वसई मोहिमेदरम्यान गोव्याकडील समुद्री किनारा संभाजी आंग्रे सांभाळत होते. संभाजी आंग्रे हे १७४२ साली वारले. त्यांच्यानंतर सरखेल पदवी तुळाजी आंग्रेंना मिळाली. यांनीसुद्धा आपल्या वडील भाऊंप्रमाणे विजयदुर्ग ते कोचीचा पूर्ण किनारा आपल्या दराऱ्या खाली आणला होता.

तुळाजी जरी पराक्रमी असले, तरी ते राजकारणी नव्हते. त्यांचे शेजारच्या मराठी संस्थांनांसोबत वाकडे होते. पंतप्रतिनिधी, वाडीचे सावंत, इतकेच नव्हे तर खुद्द कोल्हापूर छत्रपती सुद्धा त्यांच्यावर नाराज होते. मानाजी सोबतची भाऊबंदकी हि तुळाजीला वारसा हक्कासोबतच मिळाली होती, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

याचा फायदा मात्र इंग्रजांना झाला. त्यांना फक्त एकच संधी पाहिजे होती तुळाजीला नष्ट करण्याची आणि ती त्यांना मिळाली. १७५४ साली इंग्रज आणि पेशव्यांमध्ये तुळाजी आंग्रे विरुद्ध युद्ध करण्याचा करार झाला होता. त्याप्रमाणे दुसऱ्याच वर्षी त्यांनी एकत्र मिळून सुवर्णदुर्ग जिंकून घेतले. पुढच्या मोहिमेसाठी खास इंग्लंडहून आलेली भीमकाय जहाजे वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. १७५६ साली इंग्रज कंपनी, रॉयल नेव्ही व पेशव्याचे आरमार या त्रिकुटांनी विजयदुर्ग जिंकून घेतले. विजयदुर्गच्या आरमाराला युद्धात आग लागली व ते नष्ट झाले. तुळाजी आंग्रे कैद झाला. विजयदुर्गचा हा शेवटचा सरखेल.

मानाजींनी सरखेल पदवीसाठी फार प्रयत्न केले. पण ते मिळण्याआधीच ते १७५९ साली वारले. त्यामुळे त्यांचे पुत्र रघुजी आंग्रे यांना सरखेल व वजारत-म-आब या दोन्ही पदव्या मिळाल्या.

कोलाबा, सन १८५५ - १८६२
ब)कुलाबा आरमार:

कुलाब्याचे आरमार मानाजी आंग्रेंच्या हिश्यास आले. याचे त्यांनी अक्षरशः सोने केले. समुद्रावर पोर्तुगीज व सिद्दींना पछाडून सोडले. चिमाजी आप्पांच्या प्रसिद्ध वसईच्या मोहिमेत पोर्तुगीजांचे महत्वाचे उरणचे बेट यांनीच जिंकले होते. वसईला समुद्रमार्गे रसद न पोहोचू दिल्यामुळे वसईच्या सैनिकांची अन्न व दारुगोळ्यासाठी मारामार सुरु झाली. वसई विजयामागची हि पार्श्वभूमी बऱ्याच  जणांना माहित नाही.

मानाजी आंग्रे १७५९ साली वारले, त्यांच्या नंतर रघुजी आंग्रे सरखेल व वजारत-म-आब झाले. दोन्ही पितापुत्रांनी आजच्या रायगड जिल्ह्याला भरभराटी आणली. रघुजींचा काळ हा शांतिकाळ असल्यामुळे आपल्याला जास्त लढायांचे उल्लेख मिळत नाहीत. रघुजी १७९३ साली वारले आणि राज्यात अंधाधुंद माजली. १७९३ ते १८१४ काळात, दुसरे मानाजी आंग्रे, जयसिंह आंग्रे, बाबुराव आंग्रे, काशीबाई आंग्रे व परत दुसरे मानाजी आंग्रे असे सरखेल झाले. राज्यातील यादवी व मुलखीं व्यवस्थेवर दुर्लक्ष यामुळे राज्य व आरमार लयास गेले. शेवटी १८४० साली दुसरे कान्होजी आंग्रे, जे एक वर्षाचे सुद्धा नव्हते, यांच्या निधनानंतर कुलाबा संस्थान संपुष्टात आले.

१८१८ नंतर कुलाब्याचे आरमार लष्करी स्वरूपाचे न राहून फौजदारी स्वरूपाचे झाले होते. एकाप्रकारे त्याकाळचे कोस्ट गार्ड. याच भूमिकेत अजून काही दशके निघाली. १८४० किंवा ४१ साली आंग्रयांचे राज्य इंग्रजांनी गिळंकृत करून आरमार नष्ट केले.

३) पेशव्यांचे आरमार:

वसई, सन १७८०
अ)सुभा वसई

वसईची मोहीम हि १७३७-३९ पर्यंत चालली. या मोहिमेच्या सुरुवातीलाच अर्नाळा गाव आणि बेट मराठ्यांच्या हाती लागले. साहजिकच या बेटाचे आरमारी महत्व चिमाजी आप्पांच्या नजरेत आले. त्यांनी त्याच वर्षी बाजीराव बेळोसे यांना तिथे किल्ला बांधायला सांगितला आणि सुभे आरमार स्थापन केले. १७३७ साली वसई जिंकल्यावर हा सुभा वसई येथे स्थलांतरित केला गेला. बाजीराव नंतर त्यांचे पुत्र  त्रिंबकजी, व त्यानंतर नारो त्रिंबक हे सुभेदार झाले. त्या तिघांमध्ये नारो त्रिंबक हे सर्वात जास्त खटपटी होते. सुरत ते सावंतवाडी यांनी बऱ्याच स्वाऱ्या केल्या. इंग्रजांनी विजयदुर्ग पेशव्यानां परत केल्यावर तिथे एक नवीन आरमार उभारण्यात आले. या नवीन आरमाराची सुभेदारी काही काळ नारो त्रिंबकपाशी होती. वसई सुभा अंदाजे १७३७ - १८१८ पर्यंत होता.

ब) सुभा विजयदुर्ग

वर सांगितल्याप्रमाणे विजयदुर्ग येथे नवीन सुभा १७५९ पेशव्यांनी उभारला होता. या नवीन सुभ्याचे सुभेदार पद वसई आरमाराचे सुभेदार नारो त्रिंबक यांना देण्यात आले. १७६२/६३ च्या जवळपास रुद्राजी धुळप यांना विजयदुर्गची सुभेदारी देण्यात आली. हे रुद्राजी तुळाजी आंग्रेंचे आरमारी सुभेदार होते. यानंतर विजयदुर्गची सुभेदारी धुळप घराण्यात राहिली. रुद्राजी नंतर त्यांचे पुत्र आनंदराव, आणि पौत्र जानोजी यांच्याकडे सुभेदारी आली. यात आनंदराव हे सर्वात पराक्रमी होते. १७८३ साली त्यांनी रत्नागिरीजवळ टिपू सुलतानवर स्वारी करायला जाणाऱ्या इंग्रजी आरमाराला जप्त केले. या लढाईमुळे इंग्रजांमध्ये मराठा आरमाराची पुन्हा भीती भरली.

हे आरमार १८१८ पर्यंत अस्तीत्वात होते. तिसऱ्या आंग्ल - मराठा युद्धाच्या अखेरीस विजयदुर्ग इंग्रजांनी घेतला आणि या आरमाराचा अस्त झाला.

सिंधुदुर्ग, छायाचित्र: श्री उद्धव ठाकरे
४) करवीर छत्रपतींचे आरमार

याला सिंधुदुर्ग आरमार किंवा मालवण आरमार सुद्धा म्हणत. खुद्द छ. शिवाजी महाराजांनी याची मुहूर्तमेढ केलेली असल्यामुळे आणि हे आरमार कायम छत्रपतींच्याच ताब्यात राहिल्यामुळे या आरमाराला ऐतिहासिक महत्व आहे.

१७३१ साली वारणेचा तह झाला. या तहामध्ये मराठेशाहीची अधिकृत वाटणी झाली. सातारा व कोल्हापूर अशा दोन गाद्या झाल्या. या तहान्वये, विजयदुर्गच्या दक्षिणेकडील पुर्ण प्रांत कोल्हापूरकरांना मिळाला.

सिंधुदुर्गचे आरमार जरी आंग्रेंच्या तोडीचे नसले तरी ते पोर्तुगीजांना खूप त्रासदायक होते. गोव्याच्या दक्षिणेस 'केप राम' पर्यंत हे टेहळणी करीता जात होते. १७६५ साली इंग्रजांनी सिंधुदुर्ग किल्ला जिंकला. पण महाराणी जिजाबाई यांनी राजकारण करून पैसे देऊन तो सोडवून घेतला. १८१२ साली इंग्रजांसोबत झालेल्या करारानुसार सिंधुदुर्गचे आरमार खालसा करण्यात आले.

दुर्दैवाने शिवछत्रपतींनी स्थापिलेल्या या आरमारावर हवा तितका अभ्यास झालेला नाही.

तेरेखोलची खाडी
५) सावंतवाडीचे आरमार

सावंतांनी आपले आरमार कधी स्थापित केले हे सध्या सांगणे अवघड आहे. यांच्या आरमाराचा सर्वात जुना उल्लेख छ. संभाजी व राजाराम यांच्या काळातील आहे. सावंत यांनी आपल्या राज्याच्या रक्षणासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या राजांचे मांडलिकत्व स्वीकारले होते. कधी छ. शिवाजी, तर कधी औरंगजेब, कधी करवीर छत्रपती, तर कधी पोर्तुगीज.

तेरेखोलची खाडी हे सावंतांचे आरमारी तळ होते. इथे एकाच वेळी १० मोठ्या गुराबा नांगरून राहू शकत होते. संस्थानाच्या आकाराच्या मानाने सावंतांचे आरमार बरेच मोठे होते.

६) बडोद्याच्या गाईकवाडांचे आरमार.

यांचा उल्लेख ''बंदर बिलिमोडा सुभा आरमार' असा पाहायला मिळतो. दामाजी गायकवाड हे गुजरातचे सरंजामदार होते आणि त्यांनी आणि पेशव्यानी सरकार सुरतचे महसूल आपापल्यात वाटून घेतले होते. जमिनीवरील जकात व इतर कर हे पेशव्यांचे तर समुद्रावरील दस्तक व कौल गायकवाडांचे.

तब्बल ५० लहान मोठ्या नौकांनी सज्ज असलेले हे आरमार मोगल, इंग्रज व डच जहाजांवर हल्ला करून त्यांच्या कडून खंडणी वसूल करीत असे. यांच्या आरमारातील अप्पाजी पंडित आणि जयराम अप्पाजी यांची विशेष ख्याती होती.

आंग्रेंप्रमाणे यांचे आरमार सुद्धा पुढे फक्त कोस्ट गार्ड स्वरूपाचे राहिले. १८७५ पर्यंत बिलिमोडा सुभा आरमाराचा उल्लेख सापडतो.



तर थोडक्यात ही मराठ्यांनी उभारलेली वेगवेगळी आरमारे. शिवछत्रपतींनी आपल्या दूरदृष्टीने आरमाराची स्थापना केलीच पण त्यांच्या शिष्यांनी सुद्धा त्याचे अनुकरण केलेले आहे. "जैसे ज्यास अश्वबळ त्याची पृथ्वी प्रजा आहे, तद्वतच ज्याचा आरमार त्याचा समुद्र.याकरिता आरमार अवस्यमेव करावे." ही शिवाजी महाराजांची नीती त्यांनी सत्य करून दाखवली. ब्रिटिशांचे राज्य मुंबई ऐवजी बंगाल येथून का सुरु झाले याचे प्रमुख कारण होते आपले आरमार आणि तत्याने दिलेला यशस्वी सागरी लढा.

मूळ लेख: https://www.academia.edu/35051836/2017_Pratish_Khedekar_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87_Navies_of_Marathas_Jawhar_Vaibhav_Weekly_-_Diwali_Special_Edition_Oct_2017_Jawhar_Pg_45-48


छायाचित्रे:
जंजिरे वसई, सन १७८०, सबह्र ब्रिटीश लायब्ररी
जंजिरे कोलाबा, सन १८५५-१८६२ मधील छायाचित्र
जंजिरे विजयदुर्ग, सन १८५५-१८६२ मधील छायाचित्र
जंजिरे सिंधुदुर्ग, साभार: श्री उद्धव ठाकरे.
तेरेखोलची खाडी,  साभार: timelinegoa.in

Sunday, January 14, 2018

डॉ. सचिन पेंडसे कालवश

डॉ. सचिन पेंडसे यांचे काल दिनांक १३ जानेवारी रोजी हार्टअटॅकने निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. 

डॉ. सचिन पेंडसे, "मराठा आरमार - एक अनोखे पर्व" च्या प्रकाशनावेळी
डॉ. पेंडसे हे मराठ्यांचे आरमार अर्थात नौदलाचे गाढे अभ्यासक होते. गेल्याच वर्षी त्यांचे या विषयावरील पहिले मराठी ग्रंथ "मराठा आरमार - एक अनोखे पर्व" प्रकाशित झाले, ज्याला महाराष्ट्र ग्रंथोज्जक संस्थेचा पुरस्कार सुद्धा मिळाला होता. यापूर्वी त्यांचे "मरिटाईम हेरीटेज ऑफ कोंकण" हे ग्रंथ कोंकणच्या सामुद्रिक इतिहासावर लिहिलेले एकमात्र ग्रंथ म्हणून प्रसिद्ध झाले होते.

डॉ. पेंडसे हे अंधेरी, मुंबई येथील तोलानी कॉलेज येथे सहयाय्क प्राध्यापक म्हणून अध्यापन करीत होते. ते मुंबई विद्यापीठातून भूगोलात पदव्युत्तर व विद्यावाचस्पती पदवीधर होते. 

भारतीय नौसेनेच्या पश्चिम कमांडच्या मरिटाईम हिस्ट्री सोसाईटी, इंस्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड अॅनॅलिसीस, नॅशनल मरिटाईम फाउंडेशन व कोंकण इतिहास परिषदेचे आजीवन सभासद होते. यांनी लिहिलेले अनेक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पत्रिकांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत.
प्रख्यात सामुद्रिक इतिहास अभ्यासक व मुंबई विद्यापीठाचे भूगोल विधागाचे माजी-प्रमुख बी. अरुणाचलम यांच्या सोबत यांनी "Maritime Heritage of Goa and Uttar Kannada" सारखे अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिलेले आहेत.  तसेच, मरिटाईम हिस्ट्री संस्थेच्या "एस्सेस इन मरिटाईम स्टडीज" याच्या ३ ऱ्या खंडाचे संपादन सुद्धा यांनी केले आहे.

फ्रेंच सरकार व पॅरीस विद्यापिठाच्या संयुक्त विद्यमाने प्रणीत Association Oceanides (आसोसिआस्यों ओसानिदे) या जागतिक सामुद्रिक इतिहास प्रकल्पात "मराठा आरमार" व "पारंपारिक भारतीय जहाज बांधणी" या विषयावर लेखन केलेले आहे.

अमेरिकेच्या आरमारी युद्ध महाविद्यालयात (Naval War College) "मराठ्यांचा आरमारी लढा" (Maratha Naval Resistance) या विषयावर व्याख्यान दिले आहे. या व्यतिरिक्त त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ८ व राष्ट्रीय स्तरावर ५ परिसंवादात सहभाग घेतला होता.

डॉ. पेंडसे यांच्या जाण्याने मराठा आरमार अभ्यासाच्या क्षेत्रात एक न भरून येणारी पोकळी निर्माण झालेली आहे.