Friday, July 5, 2013

News in Punyanagari

लघुपटातून उलगडणार कान्होजी आंग्रेंचा इतिहास: मुंबईतील ध्येयवेड्या तरुणांचा उपक्रम
- पुण्यनगरी ५-जुलै-२०१३अलिबाग : मराठा आरमाराचे सरदार आणि अरबी सागरावर अधिराज्य गाजवणारे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाचा खराखुरा इतिहास जगासमोर आणण्याचा संकल्प मुंबईतील दोन ध्येयवेड्या तरुणांनी सोडला आहे. हे दोघे कान्होजी आंग्रे यांच्या जीवनावर आधारित लघुपट तयार करणार आहेत. आनंद खर्डे व प्रतिश खेडेकर अशी त्यांची नावे आहेत. ते आनंद जाहिरात क्षेत्रात काम करतात.आपण समाजात वावरत असताना समाजाचे काहीतरी देणे लागतो. ज्या अगणित व्यक्तींनी आपल्यासाठी खूप काही करून ठेवले आहे, त्यांच्या इतिहासाला उजाळा दिला नाही तर तो नष्ट होईल. सामाजिक दायित्वाच्या भावनेतून आम्ही हा उपक्रम हाती घेतला असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कान्होजीराजेंचा गौरवशाली इतिहास जगासमोर येईल. कान्होजी आंग्रे यांच्या इतिहासाबाबत समाजात वेगवेगळे समज-गैरसमज आहेत. ते दूर होण्यासही मदत होईल, असे आनंद खर्डे यांनी सांगितले. प्रतिश खेडेकर हा कान्होजी आंग्रे यांच्या जीवनावर अभ्यास करत आहे. लघुपटासाठी संशोधनाची जबाबदारी त्याच्यावर आहे. भारतीयांपेक्षा अन्य देशातील नागरिकांना, संशोधकांना आपल्या इतिहासाबद्दल कुतूहल आहे; परंतु पुरेशी माहिती नसल्याने ते पुढे येत नाहीत. हा इतिहास जगासमोर आला पाहिजे, या उद्देशाने आम्ही मराठीबरोबरच अन्य भाषांमध्येही या लघुपटाची निर्मिती करणार आहोत, असे प्रतिश यांनी स्पष्ट केले. त्यांच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारे स्वतंत्र लघुपट बनवण्याचा निर्णय आम्ही घेतला. आंग्रे यांचे पूर्वायुष्य, त्यांनी केलेली आरमाराची बांधणी, वेगवेगळ्या लढाया, त्यांची दानपत्रे, इंग्रजांच्या बलाढय़ आरमाराशी त्यांनी दिलेला यशस्वी लढा असे विविध विषय या लघुपटातून मांडले जाणार आहेत. त्यासाठी आम्ही स्केचेसचा वापर करणार आहोत. त्याचबरोबर पार्श्‍वनिवेदन व पार्श्‍वसंगीतही असेल. साधारण वर्षभरात हे काम पूर्ण होईल, असा दावा त्यांनी केला. गुरुवारी कान्होजी आंग्रे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून या दोघा तरुणांनी अलिबागमधील आंग्रे यांच्या समाधीस अभिवादन केले. त्यानंतर आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. लघुपट बनवण्यासंदर्भात या वेळी प्राथमिक चर्चाही झाली. केवळ आंग्रे यांचे वारस म्हणून नव्हे तर इतिहासाचे चांगले अभ्यासक म्हणून आंग्रे यांनी या तरुणांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे मान्य केले. या तरुणांच्या उपक्रमातून कान्होजीराजे यांचा जाज्वल्य इतिहास जगासमोर येईल व भावी पिढीला नक्कीच तो प्रेरणादायी ठरेल, असा विश्‍वास रघुजीराजे आंग्रे यांनी व्यक्त केला.

http://epunyanagari.com/epapermain.aspx?eddate=7%2F5%2F2013+12%3A00%3A00+AM&queryed=10&a=4&b=13414

No comments: