Thursday, April 3, 2014

Manohar Malgonkar

Writer of Kanhoji Angrey, A Maratha Admiral, & Chhatrapatis of Kolhapur - Manohar Malgonkar

मनोहर माळगावकर
- म. कृ. नाईक

माळगावकर, मनोहर दत्तात्रय : (जुलै १९१३ - १४ जून २०१०) इंडो-अँग्लिअन कादंबरीकार. जन्म मुंबईचा. मुंबई विद्यापीठातून बी.ए. झाले. आरंभी सैन्यात वरिष्ठ हुद्यावर नोकरी, नंतर खाणीच्या व्यवसायात पडले. पुढे केवळ शेती आणि लेखन.

भारतीय सेनाविश्वाचे प्रत्ययकारी दर्शन घडविणारी डिस्टंट ड्रम (१९६१) ही माळगावकरांची पहिली कादंबरी. त्यानंतर काँबट ऑफ शॅडोज (१९६२), द प्रिन्सेस (१९६३), ए. बेंड इन द गँजेस (१९६४) आणि द डेव्हिल्स विंड (१९७२) ह्यांसारख्या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. चहामळ्याच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या काँबट ऑफ शॅडोजमध्ये हेन्री विंटन ह्या स्वार्थी, आत्मकेंद्रित वृत्तीच्या व्यवस्थापकाची कहाणी सांगितली आहे. द प्रिन्सेस ही माळगावकरांची सर्वोत्कृष्ट साहित्यकृती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संस्थानांच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेत सापडलेल्या बेगवाड नावाच्या संस्थानाची कहाणी सांगणाऱ्या ह्या कांदबरीस मोठे यश लाभले. संस्थानिकांबद्दल एक प्रकारची ओढ बाळगूळही सरंजामशाही व लोकशाही ह्यांच्यातील द्वंदं त्यांनी समतोलपणे रंगविले आहे. ए बेंड इन द गँजेस ही कादंबरी भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवरची. सूड आणि क्रौर्य ह्यांचे रोमांचकारी दर्शन तीत घडते. १८५७ चे स्वातंत्र्यसमर हा द डेव्हिल्स विंडचा विषय आहे. भा. द. खेर ह्यांनी माळगावकरांच्या काँबट ऑफ शॅडोज, द प्रिन्सेस आणि द डेव्हिल्स विंड ह्या कादंबऱ्याचे मराठी अनुवाद केले आहेत. (अनुक्रमे अधांतरी, द प्रिन्सेस आणि पिसाटवारे).

ए टोस्ट इन वॉर्म वाइन (१९७४) हा त्यांचा कथासंग्रह. वेधक कथावस्तूची निवड, कथनाचे, कौशल्य, नाट्यमय प्रसंगांची आवड ही माळगावकरांच्या कथा-कादंबऱ्याची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होत.

कान्होजी आंग्रे, मराठी ॲडरिमल (१९५९), पुआर्स ऑफ देवास, सिनिअर (१९६३) आणि छत्रपतीज ऑफ कोल्हापूर (१९७१) हे त्यांनी लिहिलेले इतिहासग्रंथ. ह्यांखेरीज द मेन हू किल्ड गांधी हे त्यांचे पुस्तक १९७८ साली प्रसिद्ध झाले.

संदर्भ : Amur, G. S. Manohar Malgonkar, New Delhi, 1973.

No comments: