तेराव्या शतकापासून ते इ. स.१९४७ पर्यंत भारताने नौसेनाक्षेत्रात महत्त्वाचे कार्य केले नाही. याची कारणे म्हणजे दीर्घकालीन पारतंत्र्य व जमिनीवर होणाऱ्या लढाया ही होत. आठव्या शतकापासून ते सतराव्या शतकाअखेरपर्यंत हिंदुस्थानावर खुष्कीच्या मार्गाने परकीय आक्रमणे झाली. पंधराव्या शतकाच्या अखेरीपासून पाश्चात्त्यांनी सागरामार्गे व्यापारी आक्रमणे करून शेवटी इंग्रजांनी हिंदुस्थानावर राज्य स्थापले. इ. स. पू. सु. सोळाव्या शतकापूर्वी म्हणजे आर्यांच्या आक्रमणापूर्वी सिंधू संस्कृतीचा सुमेर, अक्कड इत्यादींबरोबर सागरी व्यापार चाले. हा व्यापार निर्विघ्नपणे चालत असण्याचा संभव नाही; परंतु तत्कालीन नौसेना कशा असाव्यात, हे मात्र सांगता येत नाही. पुरातत्त्व उत्खननात सापडलेल्या मुद्रा व भांड्यांवरील नौकांच्या चित्रांवरून त्या काळी शिडांची जहाजे होती हे कळते. रामायणामध्ये (अयोध्याकांड ९५) नदीत लढणाऱ्या नौका व सेना यांचा उल्लेख आहे. महाभारतात नौसेना हे एक सेनांग आहे. ऋग्वेदामध्ये (मंडल १, ७ व १०) नौकांचे उल्लेख आहेत; परंतु त्यांचे स्वरूप कळत नाही. पुराण, जातक इ. वाङ्मयात नौका, सागरी व्यापार इत्यादींची वर्णने आहेत.
अर्थशास्त्रातील नावाध्यक्ष (२·२८) या प्रकरणात शत्रूच्या नौकांचा विध्वंस करावा असे म्हटले आहे; तथापि चाणक्याने नौसेनेचा उल्लेख केलेला नाही. पुराणांत व जातकादी वाङ्मयात नौका, नौकाबांधणी व पर्यटन यांचे उल्लेख आहेत. गुप्त, कलिंग, हर्ष, यादव, कदंब व शिलाहार इत्यादींच्या नौसेना असाव्यात. चौलांनी नाविक बळाचा उपयोग करून जावा, सुमात्रा व कंबोज या देशांत साम्राज्यविस्तार केला होता. अकबराच्या आइन-इ-अकबरीत मोगली नौसेनेची माहिती मिळते.
नौकाबांधणीबद्दल युक्तिकल्पतरु या मध्ययुगीन ग्रंथात माहिती मिळते. ज्या नौकांच्या लांबी-उंचीचे प्रमाण १० : १ व रुंदी-उंचीचे प्रमाण १·२५ : १ असते, त्या नौका अस्थिर असतात आणि ज्यांचे प्रमाण २ : १ व १ : १ असते, त्या संकट आणतात; असा इशारा देण्यात आला आहे. एकंदरीत नौशिल्पकल्पना अवास्तव वाटतात. संस्कृत ग्रंथ घटक-कारिका (१६ ते १८ वे शतक) व औरंगजेबकालीन फतिया-इ-इब्रिया या ग्रंथांत नौकांविषयी पुष्कळ वर्णने आहेत.
स्वतंत्र भारताच्या व पाकिस्तानच्या नौसेनांचे मूळ, १६१३ साली सुरत येथे ईस्ट इंडिया कंपनीने स्थापिलेल्या ‘हिंदुस्थानी मरीन’ (इंडियन मरीन) या नौदलात सापडते. अरबी समुद्रात चाचेगिरी चाले. या चाच्यांशी मुकाबला करता यावा म्हणून ५ सप्टेंबर १६१२ रोजी दोन शस्त्रास्त्रयुक्त व्यापारी जहाजे ब्रिटिशांच्या सुरत वखारीत दाखल झाली; हीच इंडियन मरीनची सुरुवात होय. इंडियन मरीनमध्ये गुरब व गलबते (सु. ७५ ते ३०० टनभाराची) पुढे आली. त्यात हिंदू कोळ्यांची नौसैनिक म्हणून भरती केली जाई. खंबायतचे आखात, तापी व नर्मदा यांच्या मुखाजवळील सागरीक्षेत्राचे रक्षण हे काम मरीनकडे होते. सुरत, अहमदाबाद आणि खंबायत येथे नाविक प्रशिक्षण दिले जाई. १६१५ पर्यंत १० गुरब आणि गलबते काम करीत. १६२२ मध्ये इराणी आखातातील ओर्मुझ बंदर ‘मरीन’ ने ताब्यात घेऊन चाचेगिरीला बराच आळा घातला. १६६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराशी इंडियन मरीनला लढावे लागले. ५ जानेवारी १६६४ रोजी शिवाजी महाराजांच्या सुरतवरील हल्ल्या मरीनने तोफा डागून फॅक्टरीचे रक्षण केले. १६७९ मध्ये खांदेरी बेटावर शिवाजींनी जलदुर्ग बांधून ब्रिटिश, सिद्दी व पोर्तुगीज यांच्या सागरी सत्तेवर दडपण आणले. खांदेरीवरून मराठा आरमाराला हुसकावून लावण्यात इंडियन मरीन व इतर अयशस्वी झाले. १६८३ मध्ये सुरत सोडून मुंबईत इंडियन मरीनचा तळ हलविण्यात आला व त्यास ‘बाँबे मरीन’ हे नवे नाव देण्यात आले. १६८६ ते १७३६ पर्यंत मराठा आरमार व बाँबे मरीन यांच्यात पश्चिम किनाऱ्यावरील वर्चस्वासाठी सागरी लढाया चालू होत्या. ब्रिटिश शाही नौसेना, सिद्दी व पोर्तुगीज यांचे साहाय्य बाँबे मरीनला जर मिळाले नसते, तर मराठ्यांनी सरखेल आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यावर स्वामित्व स्थापले असते व हिंदुस्थानच्या इतिहासाला कदाचित निराळे वळण लागले असते. १६८० ते १७०७ या काळात मराठ्यांना जमिनीवर मोगलांशी निर्वाणीचा लढा द्यावा लागला, ही वस्तुस्थिती या संदर्भात महत्त्वाची ठरते. १७१६ च्या सुमारास बाँबे मरीनकडे २५ गुरब व गलबते होती. या नौकांवर एकूण ३८४ लहानमोठ्या तोफा होत्या. कमोडोर मॅथ्यूझ हा मरीनचा सरखेल होता. अठराव्या शतकात यूरोपात इंग्रज-फ्रेंच यांच्यामध्ये युद्धे चालू होती. त्यामुळे बाँबे मरीनची झपाट्याने प्रगती होत राहिली. १७३५ मध्ये मुंबईत हल्ली असलेल्या नाविक गोदीची बांधणी पुरी होऊन तेथे नौकाबांधणीस सुरुवात झाली. १७५० मध्ये सुकी गोदी तयार झाली. १७५१ मध्ये मरीनकडे ११ मोठ्या युद्धनौका, २५२ तोफा व पुष्कळ गलबते होती. १७४८ ते १७५६ च्या दरम्यान सरखेल संभाजी आंग्रे यांच्या मराठा आरमाराचा धुव्वा उडविण्यासाठी ब्रिटिशांनी फार प्रयत्न केले. आंग्रे यांचा वरचष्मा पेशव्यांना सहन होत नसे. नानासाहेब पेशव्याने जमिनीच्या बाजूने व बाँबे मरीनने सागरी मार्गाने धेरीया ऊर्फ सुवर्णदुर्गावर चढाई करून आंग्र्यांचा पराभव केला. या लढाईत ब्रिटिशांचे रॉबर्ट क्लाइव्ह व वॉटसन हे अधिकारी होते. पेशव्यांनी अदूरदर्शीपणाने ब्रिटिशांना पश्चिम किनाऱ्यावर सत्ता स्थापण्यास आणि मराठा साम्राज्याचा ऱ्हास करण्यात मदत केली. १७६१ च्या सुमारास बाँबे मरीनला नाविक गणवेष देण्यात आला. त्यातील अधिकारी इंग्रज असत. नौसैनिकांपैकी ७५% सैनिक कोकणी असत. मराठा आरमाराचा निकाल लावल्यावर हैदर अलीची बंदरे बाँबे मरीनने जिंकली. एकोणिसाव्या शतकारंभी जावा, सुमात्रा यांवर हल्ले करण्यात मरीन यशस्वी झाले. १७९८ मध्ये मुंबई येथे मरीन बोर्ड स्थापण्यात आले. बोर्डाच्या आज्ञेप्रमाणे सागरी वाहतुकीचे संरक्षण, मुंबई बंदरात जलमार्ग दर्शन, सागरी सर्वेक्षण व जलालेखन इ. कामे मरीनला देण्यात आली. काठेवाड, सिंध, मकरान किनारा व इराणी आखाताचे जलालेखन मरीनने केले. १८२४ मध्ये मरीनने ब्रह्मदेशावरील आक्रमणात भाग घेतला. १८२९ साली लष्करी कायदा लागू करून ‘बाँबे मरीन’ ला ‘मरीन कोअर’ नाव देण्यात आले. अमेरिकेत झालेल्या राज्यक्रांतीमुळे ब्रिटिशांना तेथील उत्तम प्रकारचे लाकूड मिळणे अशक्य झाले. जहाज बांधणीस मलबारी सागवान लाकूड उत्कृष्ट गणले जाते. परिणामतः मुंबई बंदरात जहाजबांधणीस चालना मिळाली. मुंबईच्या याट (खेळाच्या बोटींच्या) क्लबपाशी सुक्या गोदीत जहाजबांधणीसाठी तीन घसरमार्ग बांधण्यात आले. येथेच २,५९१ टनभाराची मिआनी युद्धनौका बांधण्यात आली. १८३० साली ‘मरीन कोअर’ हे नाव बदलून ‘इंडियन नेव्ही’ (हिंदी नौसेना) हे नाव देण्यात आले. २० मार्च १८३० रोजी मुंबई गोदीत बांधलेल्या व वाफेवर चालणाऱ्या ह्यू लिंडसे नौकेला समुद्रात सोडण्यात आले. शीडयुक्त जहाजांना समुद्रात ओढून नेऊन वाऱ्यात सोडण्यासाठी वाफेवर चालणाऱ्या जहाजांचा उपयोग होत असे. शिडाच्या जहाजांच्या अस्तास सुरुवात होऊन वाफेची जहाजे हिंदी नौसेनेत भरती होऊ लागली. नौकांचा टनभार (६००–७०० टनभार) वाढीस लागून सु. २०·३२ सेंमी. च्या (८ इंची) भारी तोफा प्रचारात येऊ लागल्या. १८३९ मध्ये एडन बंदर ईस्ट इंडिया कंपनीने काबीज केले. १८४३ च्या सुमारास हिंदुस्थानी नौसेनेत वाफेची ११ फ्रिगेट व इतर १५ युद्धनौका होत्या. १८४५ साली मुंबईपाशी बुचर बेटावर नाविक तोफखाना शाळा सुरू झाली. शीख-इंग्रज युद्धात नौसेनेत मुलतान मोहिमेत भाग घेतला. १८५२–५६ मध्ये ब्रह्मदेश व इराण-मोहिमांत कामगिरी केली.
१८५७ च्या उठावात नौसैनिकांचा पायदळासारखा उपयोग झाला. एका हिंदी सैनिकाला व्हिक्टोरिया क्रॉस मिळाला. उठावाचा विलक्षण परिणाम म्हणजे हिंदी नौसेनेचे विघटन होऊन मुंबई व कलकत्ता मरीन अशी दोन बिनलढाऊ नौकादले संघटित झाली. तारायंत्राच्या तारा समुद्रात सोडणे व जलालेखन करणे ही कामे त्यांस देण्यात आली. १८७७ मध्ये महाराणीचे ‘इंडियन मरीन’ उभारले गेले. हेदेखील बिनलढाऊच होते. काही पाणतीर नौका मरीनला मिळाल्या. ईजिप्त व ब्रह्मदेश यांवरील आक्रमणात मरीनने वाहतुकीचे काम सांभाळले. १८९० मध्ये मुंबईत एक पाणतीर गोदी बांधण्यात आली. १८९२ मध्ये इंडियन मरीन नाव जाऊन ‘शाही हिंदी मरीन’ हे नाव मिळाले. १८९६ ते १९०४ या काळात पूर्व आफ्रिकेत व बोअर युद्धात या मरीनने बिनलढाऊ कामे केली. पहिल्या महायुद्धात मरीनच्या बिनलढाऊ नौकांचे हत्यारी नौकात रूपांतर झाले. या युद्धाच्या अखेरीस ५०० ब्रिटिश अधिकारी व १३,००० सैनिक मरीनच्या सेवेत होते. १९१८ साली लढाऊ कारवाया करण्यास मरीनला समर्थ करावे व त्यासाठी मरीनला युद्धनौका पुरवाव्या अशी ब्रिटिश शाही नौसेनेच्या कार्यालयाला अॅड्मिरल ऑफ द फ्लीट लॉर्ड जेलिकोने शिफारस केली; परंतु अॅड्मिरल मॉवबी याच्या नेमणुकीशिवाय दुसरी भरीव कामे पुढे ढकलण्यात आली. पुन्हा १९२५ मध्ये जनरल रॉलिन्सन, अॅड्मिरल सर रिचमंड व कॅप्टन हेडलम या तिघांच्या समितीने पुढीलप्रमाणे शिफारसी केल्या : मरीनऐवजी शाही हिंदी नौसेना नाव द्यावे. ४ स्लूप युद्धनौका, २ गस्ती, ४ ट्रॉलर, २ सर्वेक्षण व १ भांडार अशा १३ नौका नौसेनेत असाव्या इत्यादी. ११ नोव्हेंबर १९२८ रोजी शाही हिंदी नौसेना कार्यान्वित झाली. ध्वज ब्रिटिशांच्याच सेनेसारखा होता व त्यात एकही हिंदी अधिकारी नव्हता. सैनिक मात्र कोकणी व बंगाली होते. १९२८ साली केंद्रीय विधानसभेत हिंदी नौसेना-शिस्त कायदा विचारासाठी आला; पण तो एकमताने फेटाळला गेला. शेवटी ८ सप्टेंबर १९३४ रोजी कायदा संमत झाला व २ ऑक्टोबर १९३४ रोजी मुंबईत हिंदी नौसेना कायदेशीरपणे प्रस्थापित झाली आणि २,००० वर्षांच्या भारतीय सागरी परंपरेचे पुनरुज्जीवन घडून आले. १९३४ पासून आगामी यूरोपीय महायुद्धाची चाहूल लागली. अॅड्मिरल ऑफ द फ्लीट लॉर्ड चॅटफील्ड याच्या नौसेनासुधारणा शिफारशी तत्काळ मंजूर झाल्या. नौसेनेच्या वाढीस व आधुनिकीकरणास गती मिळाली. अॅड्मिरल सर हरबर्ट फिट्सहरबर्ट हे नौसेनापती झाले. राखीव व स्वयंसेवक दले उभारण्यात आली. उमेदवारांकरिता नाविक प्रशिक्षणाची सोय झाली. १९४५ अखेर हिंदी नौसेनेत १५ युद्धनौका (स्लूप, फ्रिगेट व कॉर्व्हेट) आणि ४५७ इतर पूरक नौका, ३,०४४ नाविकाधिकारी व २७,४३४ नौसैनिक होते. मुंबई, कलकत्ता, विशाखापटनम्, कोचीन व मद्रास येथे मुख्य नाविक तळ होते. विविध प्रकारच्या नाविक प्रशिक्षणाच्या संस्था पुढील ठिकाणी होत्या. पाणबुडी विरोधी अधिकारीप्रशिक्षण व संदेश दळणवळण संस्था, मुंबई; तोफखाना, कराची; अभियांत्रिकी, ठाणे व तुर्भे आणि लोणावळा; प्रशिक्षणव्यवस्था, मुंबई व कराची; रडार, कराची. दुसऱ्या महायुद्धात हिंदी नौसेनेच्या पठाण, पार्वती व सिंधू या तीन युद्धनौका कामास आल्या. १९४१ मध्ये मुंबईहून प्रमुख नौसेना कार्यालय दिल्लीला हलविण्यात आले. १८ फेब्रुवारी १९४६ रोजी मुंबई येथे नौसेनेने बंड पुकारले. युद्धानंतर नौसेनेत झालेली व होणारी सैनिककपात व भविष्यकाळाची काळजी ही बंडाची कारणे होती. हिंदुस्थानातील राजकीय असंतोषाची छायाही बंडवाल्यांवर पडली होती. शेवटी राजकीय पुढाऱ्यांनी सैनिकांची मने वळविली.
माहिती साभार : मराठी विश्वकोश