Sunday, May 18, 2014

जुनी विक्रांत, नवी विक्रांत

जुनी विक्रांत, नवी विक्रांत

- विनायक तांबेकर

भारत-पाकिस्तानच्या १९७१च्या युद्धामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेली 'विक्रांत' ही विमानवाहू युद्धनौका मोडीत काढली जाणार होती. परंतु, त्याला आता सर्वोच्च न्यायालयानेही स्थगिती दिली आहे. दुसरीकडे भारतीय नौदलाने नवी विक्रांत बनवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. २0१७-१८मध्ये नवी आयएनएस विक्रांत नौदलात कार्यरत होईल. नवी विक्रांत पूर्वीच्याच दिमाखात पुन्हा एकदा नौदलाचे भूषण बनेल, यात शंका नाही.

भारतीय नौदलाची पहिली विमानवाहू नौका (एअरक्राफ्ट कॅरियर) आय. एन. एस. विक्रांत मोडीत निघण्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. १९७१ च्या भारत-पाक युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावणारी 'विक्रांत' आता दिसणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या युद्धनौकेवर इतिहासाला उजाळा देणारे संग्रहालय उभारावे, अशी कल्पना होती; परंतु नंतर ही युद्धनौका मोडीत काढून भंगारात देण्याची वेळ येऊन ठेपली होती. त्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने 'विक्रांत जैसे थे' स्थितीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत.
भारतीय नौदलाने ही विमानवाहू नौका ब्रिटिशांकडून खरेदी केली. त्या वेळी तिचे नाव एच. एम. एस. 'हर्क्युलिस' होते. विक्रांतची लांबी ७०० फूट, रुंदी १२८ फूट असून, तिचा १६ हजार टनांचा डिसप्लेसमेंट होता. त्या काळात १९५५ ते १९६५ ही युद्धनौका प्रचंडच समजली जात असे. विक्रांत नोव्हेंबर १९६१ मध्ये भारतात आले. त्या वेळी मुंबईच्या नौदल गोदीतील बॅलार्ड पियर येथे विक्रांतचे जंगी स्वागत झाले होते. पंतप्रधान पंडित नेहरू स्वत: या समारंभास हजर होते. विक्रांतचे पहिले कमांडिंग आॅफिसर कॅप्टन प्रीतमसिंग होते. तर, विमानाच्या विभागाचे प्रमुख लेफ्टनंट राम तहिलीयानी होते. हेच पुढे भारतीय नौदलाचे प्रमुख झाले, हा योगायोग म्हणावा का?
पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेस सागराने वेढलेल्या भारत देशाच्या नौदलात कमीत कमी दोन विमानवाहू नौका असाव्यात, असे सर्वांनाच वाटत होते; परंतु विमानवाहू नौका असणे आणि त्याची देखभाल करणे फार खर्चिक काम असते. तरीसुद्धा त्यावेळचे नौदलप्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल कटारी यांच्या आग्रहाने पं. नेहरूंनी विक्रांत खरेदीस हिरवा कंदील दाखविला. भारतीय नौदलाच्या इतिहासात मराठी दर्यावर्दी अधिकाºयांचे मोठे योगदान आहे.
विक्रांत भारतात आल्यानंतर लगेचच ३ वर्षांत १९६५ चे भारत-पाक युद्ध झाले. त्या वेळी विक्रांत मुंबईच्या नौदल गोदीत रिफीटसाठी होते; मात्र पाकिस्तान मीडियाने पाक नौदलाने विक्रांत बुडविल्याचे जाहीर केले होते! विक्रांतवरच्या विमानांना मुंबईच्या संरक्षणाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर १९७१ च्या बांगलादेश निर्मिती युद्धात विक्रांतने आपले योगदान चोखपणे दिले. पूर्व पाकिस्तानातून व्यापारी जहाजामधून लपूनछपून पाकिस्तानला परत जाण्याचा डाव विक्रांतच्या विमानांनी हाणून पाडला. पूर्व पाकिस्तानातील पाक सैन्याचा पराभव जेव्हा अटळ झाला. त्या वेळी त्यांच्या पुढे फक्त शरणागतीचा पर्याय होता. विक्रांतच्या सी हॉक, अ‍ॅविझे विमानांनी चिटगाव कॉक्स बझार, खुलना इ. बंदरांवर तुफान बॉम्ब हल्ले करून बंदरे निकामी केली. त्यामुळे पश्चिम पाकिस्तानला पळून जाण्याची त्यांची योजना निष्फळ ठरली. भारतीय सेनादलाच्या इतिहासातच नव्हे, तर जगाच्या इतिहासात न भूतो न भविष्यति अशी ९० हजार पाक सैनिकांची शरणागती भारतीय सेनादलाने २१ डिसेंबर १९७१ रोजी ढाक्यातील एका समारंभात स्वीकारली ! हा दिवस अजूनही भारतीय सेना विजय दिवस म्हणून साजरा करते. त्या वेळी सुरुवातीला विक्रांत अंदमान - निकोबार बेटाजवळ उभे करण्यात आले होते. त्यानंतर ते पूर्व पाकिस्तानच्या नजीकच्या समुद्रात उभे करण्यात आले. या संग्रमात नौदल अधिकाºयांनी आणि सैनिकांनी दाखविलेल्या शौर्याबद्दल २ महावीर चक्र आणि १२ वीर चक्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. त्यानंतर १९९७ पर्यंत म्हणजेच सेवेतून निवृत्त होईपर्यंत विक्रांतला सागरी युद्धाची संधी मिळाली नाही. परंतु, त्या आधी विक्रांत सदिच्छा भेटीवर मध्य पूर्व आणि दक्षिण एशिया देशामध्ये जाऊन आले होते. काळानुसार विक्रांतची टरबाईन्स इंजिने आणि इतर यंत्रणा कालबाह्य आणि जुन्या होत गेल्या. या ३६ वर्षांच्या कालावधीत विक्रांतने ४ लाख ९० हजार नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास केला होता. अखेर ३१ जानेवारी १९९७ रोजी समारंभपूर्वक विक्रांतला नौदलातून निवृत्त (डी कमिशन) करण्यात आले. त्याच वेळी हे जहाज मोडीत काढण्यापेक्षा यावर नौदलाचे संग्रहालय करावे, अशी कल्पना मांडली गेली. असे सांगणे सोपे आहे. परंतु या जहाजासाठी जागा, त्यावर ठेवण्याच्या वस्तू आणि त्याची देखभाल यासाठी लागणारा सेवकवर्ग, त्यांचा खर्च, तसेच संग्रहालय बघायला येणाºयांची सुरक्षितता आणि नौदल सुरक्षितता या सर्व गोष्टींचा सखोल विचार करणे गरजेचे होते. १९९८-९९ मध्ये महाराष्ट्रात शिवसेनेचे युती सरकार होते. विक्रांतवर संग्रहालय सुरू करण्यास ६५ कोटी रुपयांची गरज होती. बाळासाहेबांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून निधीची तरतूद करण्यास सांगितले. दुसºया दिवशी बाळासाहेबांचा विक्रांतवर फोटो आला आणि विक्रांत वाचल्याची बातमी! हे म्युझीयम नौदलाने उभे केले. त्यामध्ये भारतीय नौदलाचा इतिहास, विमानांच्या प्रतिकृती, मिसाईल इ. हे संग्रहालय पुढे ८/१० वर्षे चालू होते. परंतु, दिवसेंदिवस म्युझियमचा देखभालखर्च वाढत होता. अखेरीस आॅगस्ट २०१३ मध्ये मुंबईच्या नौदल पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल सिन्हा यांनी विक्रांत मोडीत काढण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली. केंद्राने ती मान्य केली आणि विक्रांत मोडीत काढण्याचा निर्णय झाला. विक्रांतवरील म्युझियम पुढे चालू ठेवण्यासाठी कोणतीही खासगी कंपनी किंवा राज्य सरकार पुढे आले नाही. कारण त्यावरील होणारा खर्च. केंद्र सरकार आणि नौदल मुख्यालयाच्या विक्रांत मोडीत काढण्याच्या निर्णयाविरुद्ध 'विक्रांत वाचवा' समितीतर्फे किरण पैगणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. (नोव्हे. २०१३) ती उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. समितीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आणि आता विक्रांत भंगारात काढण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळाली आहे.
दरम्यान, विक्रांतचे नाव व परंपरा चालू ठेवण्यासाठी नौदलाने आणि केंद्र सरकारने नवीन विमानवाहू नौका भारतातच तयार करण्याचा निर्णय घेतला. जगातील फक्त ५/६ देशच एअरक्राफ्ट कॅरियरची निर्मिती करू शकतात. भारत त्यापैकी एक आहे. या विमानवाहू नौकेच्या निर्मितीसाठी आधुनिक तंत्रज्ञान, तंत्रज्ञ, स्पेशालिस्ट इंजिनियर्स, डिझायनर्स आणि खास उपकरणाची गरज असते. विक्रांतच्या देशांतर्गत निर्मितीचा निर्णय घेतल्यानंतर (१९९८- ९९) तब्बल १० वर्षांनी (२००५-२००६) कोची येथील नौदल गोदीत विक्रांत उभारणीस प्रारंभ झाला. गेले ८ वर्षे नव्या विक्रांतवर कोची गोदीत काम चालू असून, त्याची चाचणी २०१६ मध्ये होईल. त्यानंतर २०१७ मध्ये हे नवे आधुनिक पुनरुज्जीवित विक्रांत भारतीय नौदलात सामील होईल. त्यावरची विमानेही आधुनिक असतील. रशियन बनावटीची आणि भारतात निर्माण केलेली असतील. लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (नौदलासाठी) ही विमाने आणि हेलिकॉप्टर त्यावर असतील. या जहाजाच्या निर्मितीसाठी ४ हजार टन स्पेशल स्टील लागते. यावरून नव्या विक्रांतच्या भव्यतेची कल्पना यावी. थोडक्यात, २०१७-१८ मध्ये दोन शक्तिशाली विमानवाहू नौका आय.एन.एस. विक्रमादित्य आणि आय.एन.एस. विक्रांत आपल्या नौदलात कार्यरत राहतील. नवी विक्रांत त्याच दिमाखात पुन्हा एकदा नौदलाचे भूषण बनेल, यात शंका नाही.
(लेखक निवृत्त कर्नल आहेत.)

लोकमत मंथन, पान ४

No comments: