नौकानयन व बरकंदाजी हे भंडारी लोकांचे पंरपरागत धंदे होत. समुद्रावरील सर्वांत मोठा अधिकारी 'महानायक' या पदवीचा असे. ‘महानायक’ या पदवी अगर अधिकारदर्शक नांवाचें 'मायनाक' हें अलीकडील रूप भंडा-याच्या आडनांवांत सांपडतें. कीर, पांजरी, नामनाईक-नांबनाईक (नौकानाईक), सारंग, तांडेल हीं भंडारी लोकांचीं आडनांवें देखील प्राचीन नौकानयनदृष्ट्या अशींच महत्त्वाचीं आहेत. होकायंत्राचा शोध लागला नव्हता अशा काळीं प्रत्येक तारवावर दूरवर उडून जाणा-या पक्ष्यांचा एक पिंजरा भरून ठेवलेला असे. समुद्रकिनारा सोडून तारवें दूरवर गेलीं, व दोन्हीं बाजूंचे तीर दिसेनासें झालें म्हणजे किनारा शोधून काढण्यासाठीं कीर नांवाचा तारवावरील अधिकारी या पिंज-यांतून दोन दोन तीन तीन पक्षी बाहेर सोडून देई. हे पक्षी आपल्या स्वाभाविक गुणांप्रमाणें किना-याकडे उडून जात. व किनारा बराच दूर असला म्हणजे संध्याकाळपर्यंत आकाशांत भ्रमण करून परत तारवावर येत. या त्यांच्या जाण्यायेण्याच्या मार्गाचें नीट धोरण राखून कीर तारूं हाकरण्याची इशारत देत असे. पांजरी या अधिका-याचें काम, राजांच्या गलबतावरील डोलकाठीच्या पिंज-यांत उभे राहून शत्रूंच्या जहाजांची टेहळणी करण्याचें असे. सारंग नांवाच्या अधिका-याला वारा कसा व कोणत्या दिशेनें वाहतो, कोठें खडक आहेत, तुफान वगैरे होण्याच्या पूर्व चिन्हांचीं व आकाशांतील नक्षत्रांची पूर्ण माहिती असावी लागे. तांडेल हा इतर खलाशी लोकांवरील मुख्य असे. लढाऊ जहाजांवरील मुख्य नांवनाईक किंवा नामनाईक असे. रत्नागिरी जिल्ह्यांतील विजयदुर्ग येथील जावकर घराण्याच्या मूळ पुरूषास, त्यानें जावा बेटांत कित्येक सफरी केल्या व तेथें जमीनजुमलाहि संपादिला होता म्हणून 'जावकर' म्हणूं लागले असें सांगतात. तेराव्या शतकांतदेखील. पश्चिमकिना-यावर भंडारी लोक समुद्रावर चांचेगिरी करून परकीय व्यापा-यांनां मनस्वी त्रास देत होते. शिवाजी महाराजानीं आरमार ठेविल्यावर चांचेगिरी करण्याचें सोडून बरेच भंडारी व कोळी लोक महराजांच्या सेवेत राहिले. महाराजांचा पहिला समुद्रसेनापति होण्याचा मानहि 'मायनाक' आडनांवाच्या भंडा-यासच मिळाला होता (१६४५ ते १६९०). दर्यासारंग, उदाजी पडवळ व सांवळ्या तांडेल नांवाचे दुसरे समुद्रसेनापतीदेखील भंडारीच होते. आंग्र्याच्या सरदारांत मायाजी भाटकर, इंद्राजी भाटकर, बकाजी नाईक, हरजी भाटकर, सारंग जावकर, तोंडवळकर आणि पांजरी वगैरे भंडारी होते (१६९० ते १७६०). त्याचप्रमाणें धुळपांच्या अधिकाराखालीं दामाजी नाईक कुवेसकर, शिवाजीराव सुर्वे, विठोजी नाईक बांवकर, अनाजी नाईक बोरकर, रायाजी नाईक बोरकर, गणोजी नाईक भाटकर, विठोजी नाईक पनळेकर, गोविंदराम बाबूराव सांळुख्ये व दरजी नाईक पाटील (१७६० ते १७९०) वगैरे सरदार भंडारी ज्ञातीचे होते. करवीर दरबारच्या मालवणच्या सरदारांत दादाजी नाईक तोंडवळकर हे भंडारी सरदार प्रमुख होते (१७८१ ते १७८२).
संदर्भ : केतकर ज्ञानकोश
टीप : वरील माहिती हि दुसऱ्या महायुद्धा आधी लिहिलेली आहे. त्यामुळे यात नवीन माहिती नाही आहेत.
संदर्भ : केतकर ज्ञानकोश
टीप : वरील माहिती हि दुसऱ्या महायुद्धा आधी लिहिलेली आहे. त्यामुळे यात नवीन माहिती नाही आहेत.
1 comment:
Bhandari hey Maharajanche mavlech hote...Palghar Jillyatil Dahanu pasun Goa kerala paryant pasarlelya KOnkan pattyat Vasai killyapasun chya konkanatil anek ladhayanmadhe tyanni jivachi baji laun Swarajya ubharnisathi hatbhar lavla..Jai bhandari
Post a Comment